सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासोबत आज सोलापूरचा दौरा केला. सोलापूरशी ऋणानुबंध असल्याने हा दौरा केला, असं शरद पवारांनी यावेळी सांगितलं आहे. हुताम्यांचं शहर म्हणून ओळख असलेल्या या सोलापूरने स्वातंत्र्यासाठी हौताम्य दिलं. त्यामुळे ब्रिटिशांना हरवणाऱ्या या शहराला कोरोनावर मात करणं फार अवघड नाही, असा शरद पवार यांनी ठाम विश्वास व्यक्त केला.
सोलापूर हे संकटावर मात करणारं शहर आहे. स्वातंत्र्यापूर्वी एक अशीच वेळ आली जेव्हा प्लेगची साथ आली होती. त्यावेळीही प्लेगवर मात करणाऱ्या ठिकाणांमध्ये सोलापूरचा समावेश होता, असं शरद पवारांनी सांगतिलं. सोलापूरचं आणखी एक वैशिष्ट्य आहे ते आरोग्यमंत्री राजेश टोपे किंवा पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांना माहिती नसेल. स्वातंत्र्याच्या आधी स्वातंत्र्य चळवळीत ब्रिटिशांचं राज्य असताना अगदी मर्यादित काळासाठी ब्रिटिशांची सत्ता घालवण्यात एकच शहर यशस्वी झालं होतं ते म्हणजे सोलापूर, असं शरद पवारांनी यावेळी आवर्जून सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासोबत सोलापूरचा दौरा केला. यात त्यांनी तेथील कोरोना नियंत्रणाच्या कामाची पाहणी करत आढावा घेतला. यावेळी त्यांनी आपण सोलापूरशी ऋणानुबंध असल्याने हा दौरा करत असल्याचं सांगितलं, तसेच सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करणार नसल्याचं स्पष्ट केलं. मात्र, कोरोना नियंत्रणासाठी राज्य आणि केंद्र सरकारने आरोग्यमंत्र्यांना अधिक मदत करण्याची गरज असल्याचं शरद पवार यांनी नमूद केलं.
सोलापूरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आणि प्रशासन चांगलं काम करत आहेत. पालकमंत्री आणि आरोग्यमंत्री यांचंही या कामात अधिक लक्ष आहे. त्यामुळे आज त्यांना केवळ राज्य सरकार आणि केंद्र सरकारने अनेक गोष्टींमध्ये अधिक मदत करणे गरजेचं आहे. रुग्णालयांमध्ये साधनांची गरज आहे. त्याची उपलब्धता करुन दिली पाहिजे. अधिक कर्मचारी हवे आहेत ते भरती केले पाहिजे. महापौरांनी नगरपालिकेच्या आरोग्य सुविधांमध्ये काही कमतरता असल्याचं सांगितलं आहे. त्यासाठी सरकारने काही अनुदान देऊन मदत केली पाहिजे,’ असं शरद पवार यांनी सांगितलं.
* आम्ही या सर्व गोष्टींची नोंद केलीय
आम्ही या सर्व गोष्टींची नोंद केली आहे. या सर्व गोष्टींसाठी आम्ही तिघेही राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेऊ. त्या दोघांच्या कानावर या गोष्टी घालू आणि या सर्व कमतरता दूर करु. यातून येथे यंत्रणांचं कोरोनावर नियंत्रण करण्याचं जे काही काम सुरु आहे त्याला हातभार लावू,’ असंही शरद पवार यांनी नमूद केलं.
* ….शून्य बिल आलं पाहिजे : आरोग्यमंञी टोपे
कोरोना रुग्णांना उपचारासाठी खासगी रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे मोजावे लागत आहे. आर्थिक परिस्थिती नसलेल्या रुग्णांची यात पिळवणूक होत आहे. या मुद्द्यांवर प्रश्न विचारला असता राजेश टोपे म्हणाले, ‘बिलांचा भार रुग्णांवर येऊ नये म्हणून जवळपास हजार रुग्णालयांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेची कॅशलेस सेवा दिली जाते. तेथे कोरोनासोबतच इतर आजार असणाऱ्यांनाही शून्य बिल आलं पाहिजे अशी अपेक्षा असते.’
‘महाराष्ट्र पहिलं राज्य आहे जेथे खासगी रुग्णालयातील 80 टक्के बेड कोरोना रुग्णांसाठी ताब्यात घेतले. रुग्णालयांच्या बिलांवर मर्यादा आणल्या. लाखो रुपये बिल येत होतं तिथं आपण 4 हजार 500 रुपयांची मर्यादा ठेवली. आयसीयूसाठी हीच मर्यादा 7 हजार 500 रुपये निश्चित करण्यात आले आहे. यात चाचणीसह सर्व घटकांचा समावेश आहे. कोणतेही वेगळे शुल्क नाही,’ असंही राजेश टोपे यांनी नमूद केलं.