अकलूज : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा माळशिरस तालुक्यातील दौरा नुकताच पार पडला. सोलापूरला जाता-जाता त्यांनी माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादीची परिस्थिती जाणून घेताना त्यांना दोन – दोन ठिकाणी नियोजित दौर्यात बदल करीत थांबावे लागले. त्यामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत गटा – तटालाच अलिंगण घालत त्यांना पुढे मार्गस्थ व्हावे लागले, अशीही चर्चा सध्या तालुक्यात रंगताना दिसत आहे.
कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शरद पवार यांनी सोलापूरचा दौरा केला. प्राप्त परिस्थितीचा आढावा घेत त्यांनी सोलापूर येथे अधिकाऱ्यांना योग्य सूचनाही केल्या. पण त्यांच्या दौऱ्याची जास्त चर्चा माळशिरस तालुक्यातील त्यांच्या नियोजनाव्यतिरिक्त दोन ठिकाणी थांबल्यानेच जास्त झाली.
माळशिरस तालुक्यातील कन्हेरचा दौरा त्यांचा नियोजित होता. येथील घराणे नेहमीच पवारांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाते. म्हणून या कुटुंबाच्या दुःख प्रसंगी पवारांचे येणे माणुसकीचे दर्शन घडवून देणारे होते. येथून त्यांचा थेट सोलापूर असा दौरा असताना त्यांची गाडी माळशिरस येथील शिवतीर्थ येथे थांबली. तेथील चर्चा विनिमय उरकून ते थेट वेळापूर येथील गरुड बंगला येथे आले. त्यामुळे राष्ट्रवादीतील शिवतीर्थ आणि गरुड बंगला अशा वादाची चाहूल तर त्यांना लागली नसावी, ना असा सूरही यानिमित्ताने ऐकावयास मिळत आहे.
शरद पवार हे देशाचे मोठे नेते आहेत. राज्यातील कोणत्याही ठिकाणची राजकीय परिस्थिती ते जाणून असतात. तशी माळशिरस तालुक्यातील ही खडानखडा राजकीय परिस्थिती त्यांना ज्ञात आहे. म्हणूनच त्यांनी नियोजित दौऱ्याव्यतिरिक्त दोन दोन ठिकाणी थांबण्याचा निर्णय घेतला. विधान परिषदेवरील नियुक्तीसाठीही तालुक्यातील राष्ट्रवादीमध्ये एकमत नसल्याचे त्यांना अनुभवयास मिळाले होते. त्यामुळे तालुक्यातील राजकीय परिस्थितीबाबत ते सर्वज्ञानी आहेत. म्हणूनच त्यांनी सर्वांची मनधरणी केली आणि मार्गस्थ झाले, असे म्हटले जात आहे.