सोलापूर : सोलापूर ग्रामीण भागात आज रविवारी एकाच दिवशी नवीन २६० बाधित रूग्णांची भर पडली. त्यामुळे रूग्णसंख्या १,८२३ वर पोहोचली तर मृत्युचा आकडा ४४ वर पोहोचला. मंगळवेढा येथे उपकारागृहातील २८ कैदी बाधित झाल्याची घटना ताजी असताना याच मंगळवेढ्यात एका न्यायाधीशालाही कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे.
जिल्हा ग्रामीणमध्ये आज सर्वाधिक ५२ बाधित रूग्ण बार्शीत आढळून आले. तर अक्कलकोट व माळशिरसमध्ये प्रत्येकी ४४ बाधित रूग्णांची भर पडली. मोहोळमध्ये ४० तर पंढरपुरात ३० नवे रूग्ण सापडले. एकूण नव्या बाधित २६० रूग्णांमध्ये १०१ महिलांचा समावेश आहे.
आजच्या वाढलेल्या रूग्णसंख्येनंतर जिल्ह्यात सर्वाधिक ४१४ रूग्णसंख्या बार्शीतील आहे. तर आतापर्यंत सर्वात पुढे राहिलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यात ४०७ रूग्ण आढळून आले आहेत. अक्कलकोटमधील रूग्णसंख्या ३२६ झाली आहे. उत्तर सोलापूर १५२, मोहोळ १४१, पंढरपूर १३५, माळशिरस ७६, माढ्यात ७३ रुग्णांची नोंद झाली आहे.