अयोध्या : अयोध्येतील राममंदिराला श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास मणिरामदास छावनीच्या वतीने 40 किलो चांदीची शिळा अर्पण करण्यात येणार आहे. 5 ऑगस्ट रोजी मंदिराच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी वैदिक मंत्रोच्चारासहीत ही शिळा स्थापन करणार असल्याची माहिती महंत नृत्यगोपाल दास यांनी दिली आहे. जय्यत तयारी चालू असून कोणाकोणाला बोलवयाचे यांचे नियोजन चालू आहे.
नृत्यगोपाल दास म्हणाले, मंदिराच्या उभारणीसाठी प्रत्येकाकडून काही ना काही मदत दिली जात आहे. अनेकांनी शक्य असेल तेवढा मदतनिधी दिला आहे. मी न्यासाचा अध्यक्ष राहिलो आहे, सध्या श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचा अध्यक्षही आहे. त्यामुळे या महायज्ञात आपल्या वतीने समर्पण करण्याची जबाबदारी आम्ही या शिळेच्या स्वरुपात पार पाडत आहोत. मणिरामदास स्वामी सेवा ट्रस्ट नेहमीच सांस्कृतिक वारसा जपण्याचे काम करत आली आहे, असे नृत्यगोपाल दास यांनी म्हटले आहे.
कोरोनाच्या संकटामुळे रखडलेले राम मंदिराचे काम आता सुरू होणार आहे. ५ ऑगस्टला भूमीपूजनाचा मुहूर्त निश्चित झाला आहे. दरम्यान, अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामाच्या हालचाली वेग घेऊ लागल्या आहेत. भूमिपूजनासाठी भव्य तयारी केली जात आहे. सर्व नियम लक्षात घेऊन हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान मोदी यांच्या व्यतिरिक्त इतर अनेक दिग्गजांना आमंत्रण दिले जाऊ शकते.
राम मंदिर चळवळीशी संबंधित अनेकांना या पूजनासाठी बोलावले जाऊ शकते. माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, भाजपचे दिग्गज नेते मुरली मनोहर जोशी यांना देखील बोलावण्यात येणार आहे. तसेच उमा भारती, विनय कटियार आणि साध्वी ऋतंभरा यांना बोलवले जाऊ शकते.आलोक कुमार, मिलिंद परांडे विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सहभागी होऊ शकतात. मोहन भागवत आणि अन्य काही नेते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सहभागी होऊ शकतात.