अकलूज : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अकलूज ग्रामपंचायतीने लॉकडाऊनची घोषणा केली आहे. गुरुवारपासून ते शनिवारपर्यत तीन दिवस अत्यावश्यक सेवा कडकडीत बंद राहणार आहेत. बंदच्या सुचनांचे काटेकोरपणे पालन न केल्यास संचारबंदी कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे ग्रामस्तरीय समिती अकलूज यांनी जाहीर केले आहे.
अकलूजमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना संसर्ग पसरण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. या बाबत ग्रामस्तरीय समिती सभेत अकलूज येथील कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या व त्यातून होत असलेल्या संक्रमणही साखळी रोखण्यासाठी अकलूजमधील सर्व व्यापारी व सामाजिक संघटना आणि नागरिकांच्या विनंती वरून घेतलेल्या निर्णयानुसार अकलुज ग्रामपंचायत व ग्रामस्तरीय समीती यांनी २३ जुलै ते २५ जुलै तीन दिवसाच्या लाँकडाऊनची घोषणा केली आहे.
सदर संचारबंदी कोरोना संक्रमण साखळी रोखण्यासाठी असल्याने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करा अन्यथा संचारबंदी नियमानुसार कारवाई होऊ शकते असा इशाराही देण्यात आला आहे.
* अडचण आल्यास संपर्क साधा
लॉकडाऊन काळात फक्त औषध दुकाने व दुध व्यवसाय सुरु राहणार आहेत. इतर कोणतेही व्यवसाय सुरु राहणार नाहीत. अत्यावश्यक कारणास्तव बाहेर जाणे करता नोडल ऑफिसर नितीन चव्हाण (९८८१५६३१७८) यांच्याशी संपर्क साधावा. त्याशिवाय घराबाहेर कुणी आढळल्यास कडक कारवाई केली जाईल. इतर काही अडीअडचणी करता अकलूज ग्रामपंचायत कम्युनिकेशन सेंटर रोहित शेटे (९७६३८७४७३७) येथे संपर्क साधावा.