पुणे : क्षुल्लक भाजी सांडल्याच्या कारणावरुन वडिलाने रागावल्याने दहा वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. चिखली येथील मोरेवस्ती येथे आज मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
वेंकटेश लक्ष्मण पुरी, असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. त्याचे वडील लक्ष्मण महादेव पुरी (रा. श्रीकुंज हौसिंग सोसायटी, मोरेवस्ती, चिखली, पिंपरी-चिंचवड, मूळ रा. इंगेगाव, ता. परळी, जि. बीड) यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
मयत वेंकटेश याचे वडील लक्ष्मण पुरी हे टॅक्सी ड्रायव्हर आहेत. तर आई धुणीभांडीचे काम करते. काल सोमवारी भाजी सांडल्याने वडील रागावले. त्याचा वेंकटेश याला राग आला. दुसऱ्या दिवशी आज मंगळवारी सकाळी त्याची आई व वडील घराबाहेर गेले. त्यानंतर वेंकटेश व त्याची तीन वर्षांची लहान बहीण घरात होते. दुपारी अडीचच्या सुमारास वडील घरी आल्यानंतर मुलगा बाथरुममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. वेंकटेश हा आकुर्डी येथील महात्मा फुले इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता चौथीमध्ये शिकत होता.