नवी दिल्ली : चीन आणि इराण या दोन्ही देशांमध्ये ४०० अब्ज डॉलर्सच्या डील झाली होती. याच परिणाम भारतावर झाल्याचे म्हटले जात होते. परिणामी काही दिवसांपूर्वी चीनसोबत मोठी डील केल्यानंतर चाबहार रेल्वे प्रकल्पातून इराणने भारताला वगळण्यात आल्याचे वृत्त आले होते. परंतु आता खुद्द इराणने या वृत्ताचे खंडन केले आहे. भारत हा चाबहार जहेदान रेल्वे प्रकल्पाचा भाग असल्याचे इराणने स्पष्ट केले आहे.
भारताला इराणने चाबहार रेल्वे प्रकल्पांमधून वगळले असल्याच्या या वृत्तांचे इराणकडून खंडन करण्यात आले आहे. इराणचे परिवहन आणि रेल्वे विभागाचे उपमंत्री सईद रसौली यांनी यावर प्रतिक्रिया दिली. या वृत्तांमागे कोणता तरी कट असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
२०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इराण दौर्यादरम्यान चाबहार करारावर स्वाक्षरी झाली होती. संपूर्ण प्रकल्पात सुमारे १.६ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक होणार होती. इरकॉनचे अभियंतेदेखील हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी इराणमध्ये गेले होते. परंतु अमेरिकेच्या निर्बंधामुळे भारताने रेल्वे प्रकल्पाचे काम सुरू केले नाही. अमेरिकेने चाबहार बंदरासाठी सवलती दिल्या आहेत, पण उपकरण पुरवठादार उपलब्ध नाहीत.
गेल्या आठवड्यात इराणचे परिवहन व नगरविकास मंत्री मोहम्मद इस्लामी यांनी ६२८ किलोमीटर लांबीच्या रेल्वे ट्रॅकच्या कामाचं उद्घाटन केलं. हा रेल्वे मार्ग अफगाणिस्तानाच्या झारंज सीमेपर्यंत वाढविण्यात येणार आहे. द हिंदूनं दिलेल्या वृत्तानुसार हा प्रकल्प मार्च २०२२ पर्यंत पूर्ण होणार आहे. भारतानं यासाठी निधी न दिल्याचं सांगत या प्रकल्पातून भारताला वगळण्यात आल्याचं वृत्त माध्यमांमध्ये काही दिवसांपूर्वी प्रकाशित झालं होतं.