करमाळा : करमाळा शहर व ग्रामीण भागातील आज मंगळवारी एकूण ९२ अँटिजीन टेस्ट घेण्यात आल्या. त्यापैकी एकूण १८ जणांचा रिपोर्ट पाॅझिटीव्ह आढळून आलेला आहे. आज झालेल्या ९२ पैकी व ७४ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. यामुळे करमाळा शहरासह तालुक्यातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात ग्रामीण, शहरी भागात शुकशुकाट दिसून येत आहे.
कोरोना पाॅझिटीव्ह असलेल्या १८ जणांच्या पैकी करमाळा शहरातील महसूल विभागातील २ कर्मचारी तर मंगळवार पेठ येथील २ महिला असे एकूण ४ जणांचा रिपोर्ट पाॅझीटीव्ह आला आहे, तर ग्रामीण भागामध्ये वरकुटे येथे १, सालसे येथे २, व आळसुंदे येथे तब्बल ११ कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे करमाळा शहर व तालुक्यातील एकुण कोरोना बाधितांची संख्या ५० झाली आहे.
काल रविवारी आळसुंदे येथे केवळ १ कोरोना पाॅझिटीव्ह आढळून आलेला होता. मात्र आज तब्बल ११ जण कोरोनाबाधित आढळले आहेत. यामुळे करमाळा तालुक्यासाठी रॅपिड अँटिजेन टेस्टची संख्या वाढविण्यात येणार आहे. परंतु नागरिकांनी प्रशासनाच्या सुचनांची अंमलबजावणी करावी तसेच मास्क सॅनिटायझरचा वापर करा, आपले हात वारंवार स्वच्छा धुवा, असे आवाहन करमाळा तहसीलदार समीर माने यांनी केले आहे.