सोलापूर : सोलापूर ग्रामीणमध्ये आज बुधवारी आलेल्या कोरोना अहवालात सर्वाधिक रुग्ण आणि उपचाराखाली रुग्ण बार्शीत आहेत. दुर्देवाने कोरोना अहवालात बार्शीने सर्व तालुक्यांना मागे टाकले आहे. आज सोलापूर ग्रामीण भागात १२६३ निगेटिव्ह तर नव्याने १३४ पॉझिटिव्ह तर सुदैवाने आज मृत्यू नसून ४३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत एकूण मृत्यू ४८ तर बाधित २ हजार २७५ आणि ६६२ जण ठीक झाले आहेत.
जिल्ह्यातील 11 तालुक्यांमध्ये ऍन्टीजेन टेस्टवर मोठ्या प्रमाणावर भर दिला जात आहे. आतापर्यंत 17 हजार 619 व्यक्तींची कोरोना टेस्ट झाली आहे. त्यामध्ये दोन हजार 275 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. मंगळवारी जिल्ह्यातील एक हजार 397 व्यक्तींची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये 134 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. समाधानाची बाब म्हणजे आज एकाचाही मृत्यू झालेला नाही. दरम्यान, शहरात आतापर्यंत 21 हजार 529 टेस्ट झाल्या असून अल्पावधीच जिल्ह्याने आघाडी घेतली असून आतापर्यंत 17 हजार 919 टेस्ट पूर्ण झाल्या आहेत.
* या गावांमध्ये आढळले नवे रुग्ण
– नातेपुते (माळशिरस) तीन, दक्षिण सोलापुरातील बोरामणी, धोत्री, होनमुर्गी, मनगोळी, नवीन विडी घरकूलात प्रत्येकी एक, कुंभारीत दोन, मंद्रूपमध्ये दहा, तर अक्कलकोटमधील एवन चौकात चार, देशमुख गल्लीत पाच, खासबाग, सुभाष गल्ली, वेताळ चौक, सुलेरजवळगे येथे प्रत्येकी एक, किनीत सहा, मैंदर्गीत पाच, माणिकपेठेत दोन रुग्ण आढळले आहेत. तसेच करमाळ्यातील मंगळवार पेठ व तहसिल कार्यालय येथे प्रत्येकी दोन, अळसुंदे येथे 11, वरकुटे येथे एक रुग्ण सापडला आहे. मंगळवेढ्यातील भिम नगर, पोलिस ठाण्याजवळ, दामाजी नगरात प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. तसेच उत्तर सोलापुरातील नान्नजमध्ये 17 रुग्णांची भर पडली असून तिऱ्ह्यात एक रुग्ण सापडला आहे. माढ्यातील मिटकलवाडीत एक, मोहोळमधील बाजार तळ दोन, गुलशन नगर व माळी गल्लीत प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.