सोलापूर : मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून कर्जमाफीची पाचवी यादी प्रसिध्द करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यातील 1 हजार 770 शेतकऱ्यांची यादी बँकांना मिळाली आहे.
जिल्ह्यातील 78 हजार 835 शेतकऱ्यांची यादी बँकांनी अपलोड केली आहे. त्यापैकी 65 हजार 195 शेतकऱ्यांना आतापर्यंत 582 कोटी 11 लाख रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. बँकांना जिल्ह्यातील 1 हजार 770 शेतकऱ्यांची यादी प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी दिली.
महाविकास आघाडी सरकारने महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेतून शेतकऱ्यांना दोन लाखांची कर्जमाफी जाहीर केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांची यादी शासनाला पाठविण्यात आली होती. मात्र, लॉकडाउनमुळे ही योजना थांबली होती. आता कर्जमाफीच्या लाभाची प्रक्रिया पुन्हा सुरु केली आहे. जिल्ह्यातील एकूण 78 हजार 835 शेतकऱ्यांपैकी 73 हजार 415 शेतकऱ्यांची यादी बॅंकांना प्राप्त झाली आहे.
त्यापैकी 69 हजार 791 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण पूर्ण झाले आहे. आधार प्रमाणिकरण होऊनही तीन हजार 624 शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नव्हता. मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून आज कर्जमाफीची पाचवी यादी प्रसिध्द करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यातील एक हजार 770 शेतकऱ्यांची यादी बॅंकांना मिळाली आहे. आता आधार प्रमाणीकरण झालेल्या एक हजार 854 शेतकऱ्यांना लाभासाठी आणखी काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
* पाच हजाराहून अधिक शेतकऱ्यांची नावेच नाहीत
सोलापूर जिल्ह्यातील बँकांनी अपलोड केलेल्या 78 हजार 835 शेतकऱ्यांपैकी 73 हजार 415 शेतकऱ्यांचीच नावे बँकांना शासनाकडून पाठविण्यात आली आहेत. त्या शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. 65 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना लाभही मिळाला आहे. मात्र, पाच हजार 420 शेतकऱ्यांची नावेच यादीत आलेली नाहीत. या शेतकऱ्यांची नावे कशामुळे राहिली, त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार की नाही, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.