नवी दिल्ली : कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन आदी कारणामुळे लांबणीवर पडलेला राज्यसभेच्या नवनियुक्त खासदारांचा शपथविधी सोहळा आज पार पडला. उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती सभापती व्यंकय्या नायडू यांच्या दालनामध्ये झाला. या वेळी महाराष्ट्रातील शरद पवार, उदयनराजे भोसले, प्रियंका चतुर्वेदी, डॉ. भागवत किशनराव कराड, राजीव सातव आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी खासदार पदाची शपथ घेतली. कोरोना व्हायरस संसर्गाचा धोका ओळखून सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करत हा सोहळा पार पडला.
महाराष्ट्रातील खासदारांसोबतच देशातील इतर राज्यांतील नवनियुक्त सदस्यांनीही राज्यसभा खासदारकीची शपथ घेतली. उल्लेखनीय असे की मराठी बाणा कायम ठेवत काँग्रेस खासदार राजीव सातव, शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी आणि भाजपचे खासदार भागवत कराड यांनी मराठीतून शपथ घेतली आहे. त्यामुळे या तिन्ही खासदारांवर राज्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. तर शरद पवार यांनी हिंदीतून आणि उदयनराजे भोसले यांनी इंग्रजीतून शपथ घेतली आहे.
राज्यसभेचा नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा आज पार पडला. यावेळी महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह भाजपचे नेते उदयनराजे भोसले, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले खासदारकीची शपथ घेतली आहे. राजीव सातव यांची खासदारकीची मराठीतून शपथ घेतली आहे. आज सकाळी अकरा वाजता हा शपथविधी सोहळा पार पडला.
देशात कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन जाहीर झाला. या लॉकडाऊनच्या काळात संसदेचं कामकाज पुढे ढकलण्यात आलं होतं. दरम्यान या सोहळ्यासाठी आज संसदेची दार उघडण्यात आली. देशभरातील एकूण ६२ खासदार निवडून आले असून त्यांचा शपथिविधी सोहळा हा अधिवेशनात पार पडणार आहे. आज केवळ काही मोजक्याचं नेत्यांनी शपथ घेतली.
खासदार डॉ. भागवत कराड यांनी आपण मराठीतून शपथ घेणार असल्याचे आधीच सांगितले होते. याबद्दल माहिती देताना ते म्हणाले होते,मराठी ही माझी मातृभाषा आहे म्हणून मी मराठीत शपथ घेणार व मराठवाड्याच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू असे डॉक्टर भागवत कराड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते.