टेंभूर्णी : कोरोनाचा संसर्ग ग्रामीणमध्ये पसरू लागला असून टेंभुर्णी शहरालगतच्या काल मंगळवारी मिटकलवाडीत एक रुग्न कोरोनाबाधीत आढळून आला होता. त्याचे संपर्कात आलेली त्याची भाची अकोले खुर्द येथील नववधूचा रिपोर्ट टेंभुर्णीत केलेल्या ॲन्टीजन रॕपीड टेस्टमध्ये कोरोना पॉझीटीव्ह आला असल्याची माहिती आज आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.
सदर रुग्णांच्या संबंधात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना क्वारंटाईन करण्याचे काम प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहे. तर मिटकलवाडी येथील कोरोना बाधित रुग्ण अकोले खुर्द येथील नवरीचा मामा आहे. दोन्ही रुग्णांवर कुर्डूवाडी येथील कोवीड सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत.
माढा तालुक्यातील आकोले खुर्द येथील चिंतामणी वस्तीवरील एक विवाह परांडा तालुक्यातील वागवान येथे १४ जुलै रोजी पार पडला होता. या विवाह सोहळ्यास गेलेल्या मिठकलवाडीतील नवरीच्या मामाचा काल मंगळवारी कोरोना पॉझीटीव्ह रिपोर्ट आला होता. तर त्यांच्या संपर्कातील आलेली आकोले खुर्द येथील नवरी कालच आपल्या गावी आली होती. बुधवारी टेंभुर्णीत ॲन्टीजन रॕपीड टेस्टमध्ये तिचा रिपोर्ट कोरोना पॉझीटीव्ह आला आहे. तर या दोघांचे संपर्कात आलेल्या मिठकलवाडी, आकोले खुर्द ४ आणि कन्हेरगाव येथील ७ असे ११ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
दगड आकोले, आकुंबे, मिठकलवाडी व आज आकोले खुर्द या टेंभुर्णी शहराच्या आसपासच्या गावात कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने टेंभुर्णीकरांचे टेन्शन वाढले आहे. तलाठी प्रशांत पाटील, वैद्यकीय आधिकारी डॉक्टर अमोल माने आकोलेचे पोलीस पाटील नागेश पाटील यांचेसह अधिकारी बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरु असून दहा दिवस आकोले खुर्द गाव बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.