अहमदनगर : रयत शिक्षण संस्थेच्या कारभारात शरद पवार यांच्या तिस-या पिढीतील अर्थात नातवाची एंट्री झाली आहे. धडाकेबाज कार्यशैलीसाठी आमदार रोहित नगर जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत. त्यांनी अल्पावधीत राजकीय पकड सिद्ध केली आहे. आता रयत संस्थेतून सामाजिक क्षेञातही काम करण्याची संधी मिळाली आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी आमदार आशुतोष काळे यांची निवड करण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मॅनेजिंग कौन्सिलच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
मागील तीन वर्षांपूर्वी आशुतोष यांची संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी निवड झाली. काळे परिवाराचा ‘रयत’मधील योगदानाचा विचार करून, तसेच आमदार आशुतोष यांच्या कामाचा आवाका विचारात घेऊन त्यांच्यावर संस्थेच्या उत्तर विभागीय सल्लागार समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली.
दुसरीकडे संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार व आढळगाव (ता. श्रीगोंदे) येथील ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाष गांधी यांची निवड झाली. पवार घराण्यातील आमदार रोहित हे तिसऱ्या पिढीतील वारस मानले जातात. धडाकेबाज कार्यशैलीसाठी आमदार रोहित नगर जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत. तर गांधी यांनी संस्थेच्या आढळगाव व परिसरातील शैक्षणिक विकासात सतत पुढाकार घेतला. नागवडे सहकारी कारखान्याचे ते 10 वर्षे संचालक व आढळगावचे दीर्घ काळ सरपंच होते.