पनवेल : राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी राम मंदिराच्या भूमिपूजनावरून केलेल्या विधानानंतर भाजपचे अनेक नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शरद पवार यांच्या वक्तव्याचा भाजपा युवा मोर्चा यांनी निषेध करीत पवार यांच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन सुरु केले आहे. तसेच शरद पवार यांना प्रभु श्री रामाची आठवण करून देण्यासाठी त्यांना जय श्री राम लिहलेले 10 लाख पत्र पाठवले जाणार असल्याचे भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र अध्यक्ष विक्रांत पाटील सांगितले.
सोलापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अयोध्येतील राम मंदिराबाबत एक वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा हवाला देऊन आता भाजपने शरद पवार आणि महाविकास आघाडीची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. भाजप युवा मोर्चाच्यावतीने शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी जय श्री राम लिहिलेली १० लाख पत्र पाठवण्याचा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. आज राज्यभरातून या उपक्रमाला सुरुवात झाली असल्याची माहिती भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी दिली.
विक्रांत पाटील यांनी स्वतः पनवेल येथील पोस्ट ऑफिसमध्ये शरद पवारांना पत्र पाठवले. त्यानंतर माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, “अयोध्या येथील प्रभू रामचंद्रांच्या मंदिर निर्माणाचा शुभारंभ ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून या निमित्ताने संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे.
या विषयात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी वादग्रस्त विधान करत समस्त रामभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. राम मंदिर बांधल्याने कोरोना जाणार आहे का? असे विधान एका जाणत्या नेत्याने करणे म्हणजे फारच खेदजनक असल्याचे म्हटले आहे.
* काय म्हणाले होते शरद पवार
सोलापूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले होते की, “कोणत्या गोष्टीला कधी महत्त्व द्यायचे, हे आमच्यादृष्टीने महत्त्वाचे आहे. आमच्यादृष्टीने आज कोरोना घालवणे हे महत्त्वाचे आहे. काही लोकांना मंदीर बांधून कोरोनाचा प्रश्न सुटेल असे वाटत असेल, तर आम्हाला त्याबाबत कल्पना नाही.”
” शरद पवार हे मोठे सन्माननीय नेते आहेत. परंतु प्रभू रामचंद्राच्या विषयात, असे नकारात्मक कोणी बोलणार असेल तर प्रभु रामाची आठवण करून देण्याचे काम नेहमीच भारतीय जनता युवा मोर्चा करत राहील. कोरोना महामारी विषयांमध्ये केंद्रातील सरकार उचित कार्यवाही करत आहे व संपूर्ण देशात योग्य दिशेने काम सुरू आहे, इतर सर्व राज्यही चांगले काम करीत आहेत. परंतु या बाबतीत महाराष्ट्रात मात्र कोठेही सुसूत्रता दिसत नाही”
विक्रांत पाटील, प्रदेशाध्यक्ष – भाजपा युवा मोर्चा