गांधी नगर : गुजरातमधील मेहसाणा पोलिसांनी काल बुधवारी रात्री बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आणि भाजपचे माजी खासदार परेश रावल यांचा छोटा भाऊ हिमांशु रावल याला जुगार खेळण्याच्या आरोपाखाली अटक केली. विशेष म्हणजे हा जुगाराचा क्लब ही परेश रावल यांच्या चुलत भावाचा असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी एका क्लबवर छापा टाकला असता तिथे हिमांशु रावल, कीर्ती रावल यांच्यासहीत २० लोकांना ताब्यात घेण्यात आले. अटक केलेल्या लोकांकडून ६ लाख ३३ हजार ५०० रुपयांची रोकड, १६ मोबाईल आणि तीन वाहन जप्त करण्यात आले.
मेहसाणा जिल्ह्यातील विसनगरमध्ये कृष्णा सिनेमाजवळ मथुरादास नावाचा क्लब आहे. हा क्लब परेश रावल यांचे नातेवाईक कीर्ती रावल चालवतात. कीर्ती रावल या क्लबचे ट्रस्टी असल्याचे देखील बोलले जाते. परेश रावल यांचा भाऊ हिमांशु हा लॉकडाऊन दरम्यान मुंबईहून विसनगर येथे आला होता.
या क्लबमध्ये अहमदाबाद, गांधीनगर, मेहसाणा आणि जवळपासच्या जिल्ह्यातील लोकांना गाडीने आणले जाते. त्यानंतर हे सर्व लोक येथे जुगार खेळतात, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी सोमवारी रात्री दीडच्या दरम्यान कल्बवर छापा टाकला होता. पोलीस उपनिरीक्षक वाय. के. झाला यांनी सांगितले की, आरोपी हिमांशु रावल अहमदाबादचे माजी खासदार परेश रावल यांचा भाऊ आहे. तर दुसरा आरोपी किर्ती रावल हा चुलत भाऊ आहे. या क्लबमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून जुगार खेळला जात असल्याची बाब चौकशी नंतर समोर आली.
अभिनेते परेश रावल (वय ६५) हे २०१४ साली अहमदाबाद पूर्व येथे भाजपचे खासदार म्हणून निवडून आले होते. बॉलिवूडमधील अनेक चित्रपटात त्यांनी भूमिका साकारलेल्या आहेत. कॉमेडी, चरित्र भूमिका, नकारात्मक पात्र अशा विविध भूमिकांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडलेली आहे.