जयपूर : राजस्थानमधील सत्तासंघर्ष आता शिगेला पोहोचला आहे आणि या संघर्षाचा प्रवास उच्च न्यायालय ते सुप्रिम कोर्टमार्गे थेट पंतप्रधानांपर्यंत झाला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राज्यात सुरू असलेल्या राजकारणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पत्र पाठविले आहे आणि सरकार पाडण्याच्या प्रयत्नात सहभागी असलेल्यांना इतिहास कधीच माफ करणार नाही, असे म्हटले आहे.
राजस्थानमधील सरकार पाडण्याचा प्रयत्न भाजप करीत असल्याचा आरोप मुख्यमंत्री गेहलोत यांनीच सर्वप्रथम केला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यासह काही काँग्रेस आमदारांनी बंडाचे निशाण फडकावले. त्यालाही भाजपची फूस असल्याचे गेहलोत यांनी म्हटले होते. हा वाद आता सुप्रिम कोर्टात पोहोचला आहे.
राजस्थानमध्ये लोकशाही पद्धतीने सत्तेवर आलेले सरकार घोडेबाजाराच्या माध्यमातून पाडण्याचा प्रयत्न आहे. वेंâद्र व राज्यात वेगळ्या पक्षांची सरकारे निवडून येतात आणि हेच आपल्या लोकशाहीचे सौंदर्य आहे. कोरोना महामारीच्या काळात जनतेचा जीव वाचवणे हीच आमची प्राथमिकता आहे, पण राजस्थानात निवडून आलेले सरकार पाडण्याचा यावेळी प्रयत्न केला जात आहे. लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार पाडणे लोकशाहीविरोधात असून हे षड्यंत्र सर्वसामान्यांचा विश्वासघात असल्याचेही गेहलोत यांनी पत्रात म्हटले आहे.
“केंद्रात सत्तेत असलेला पक्ष कोरोना नियंत्रणाची प्राथमिकता सोडून राज्यातील सरकार पाडण्यासाठी मुख्य भूमिका पार पाडत होता. असेच आरोप मध्य प्रदेशात सरकार पाडण्याच्या वेळीही झाले होते. त्यामुळे तुमच्या पक्षाची देशभर बदनामी झाली. तुम्हाला याबद्दल किती माहीत आहे की, तुमची दिशाभूल केली जात आहे हे मला माहीत नाही. मात्र अशा कृत्यात सहभागी असलेल्यांना इतिहास कधीही माफ करणार नाही”
अशोक गेहलोत, मुख्यमंञी – राजस्थान