नवी दिल्ली : दिल्लीतील सर्वात मोठे सेक्स रॅकेट चालविणार्या सोनू पंजाबन हिला नुकतेच तब्बल २४ वर्ष तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. स्थानिक कोर्टाने ही शिक्षा ठोठावताना सांगितले की, तिने महिला म्हणून सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत आणि त्यामुळेच न्यायालयाने तिला दोषी ठरवत कठोर शिक्षा सुनावली आहे.
सोनूला कोर्टाने नुकतीच २४ वर्षांची शिक्षा सुनावली असून तिचा त्याचा साथीदार संदीप बेनीवाल यालाही २० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्याच्यावर अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याचा आरोप होता. दरम्यान, कोर्टाने अल्पवयीन मुलीला ७ लाख रुपयांची भरपाईसुद्धा देण्याचे आदेश दिले आहेत.
गेल्या आठवड्यात जेव्हा दिल्ली कोर्टाने तिला दोषी ठरवले तेव्हा तिने तिहार तुरुंगात आत्महत्येचा देखील प्रयत्न केला होता. दरम्यान, २०१३ साली आलेला ‘फुकरे’ आणि ‘फुकरे रिटर्न्स’ हा चित्रपट याच गोष्टीवर आधारित होता, यात रिचा चड्ढाने सोनू पंजाबनच्या भूमिकेत भोली पंजाबनची भूमिका साकारली होती.
हरियाणाच्या झज्जरमधील एका खून प्रकरणात देखील तिला अटक करण्यात आली होती. सोनूला २००७ मध्ये पहिल्यांदा एका तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली होती, परंतु तिला जामीन मिळाला होता आणि त्यानंतर २००८ मध्ये तिला पुन्हा अटक झाली होती. २०११ मध्ये एजंट बनून पोलिसांनी तिला पुन्हा अटक केली. यावेळी पोलिसांनी तिला तिच्या चार साथीदारांसह मैहरोली येथून अटक केली होती. पण कोणताही ठोस पुरावा नसल्याने ती पुन्हा तुरुंगातून बाहेर आली होती.
दरम्यान, २०१४ साली एका मुलीने तिच्या तावडीतून कसाबसा पळ काढला आणि त्याच्याविरुद्ध नजफगड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तिने पोलिसांना सांगितले की, वयाच्या १३ व्या वर्षी संदीप बेनीवाल या व्यक्तीने तिचे अपहरण केले होते आणि सोनूला विकले होते. त्यानंतर एक वर्षाच्या आत तिला १२ वेगवेगळ्या पुरुषांशी संबंध ठेवण्यास भाग पाडले गेले. सोनू पंजाबनला विकण्यापूर्वी तिला इंग्रजी भाषेचे प्रशिक्षण दिले गेले जेणेकरुन ती ग्राहकांना आकर्षित करु शकेल.
* सोनू पंजाबनचा इतिहास
सोनू पंजाबन हिचा जन्म पूर्व दिल्लीत झाला होता. सोनू पंजाबनच खरं नाव गीता अरोडा आहे. देशातील अनेक राज्यात वेश्याव्यवसाय चालवत होती. हा सगळा व्यवसाय ती दक्षिण दिल्लीतून चालवत होती. अभिनेत्री किंवा मॉडेल होण्याची इच्छा असणाऱ्या मुलींना फसवून किंवा त्यांचे अपहरण करुन ती त्यांना जबरदस्तीने या धंद्यात ओढायची. त्यानंतर त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले जायचे. आपल्या या वेश्या व्यवसायात ती मुलींना शक्तिशाली लोकांकडे पाठवत असे.
* देशातील प्रत्येक राज्यात सेक्स रॅकेट
२०११ मध्ये पोलिसांच्या निवेदनानुसार, तिच्याकडे अनेक हाय-क्लास सेक्स वर्कर देखील होते. ज्यांना ती दिल्लीतील अनेक फाइव्ह स्टार हॉटेल आणि फार्म हाऊसमध्ये देखील पाठवत होती. काही वर्षांपूर्वी तिने दक्षिण दिल्लीच्या उच्चभ्रू वस्तीत घर घेतले होते. तेव्हापासून ती दिल्ली पोलिसांच्या रडारवर होती. तिने देशातील जवळजवळ प्रत्येक राज्यात सेक्स रॅकेट सुरु केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, तिला गुंड प्रवृत्तीचे पुरुष अधिक आवडायचे. त्यामुळे ती अशा पुरुषांच्याच मागे असायची. पण जे काही गुंड तिच्या आयुष्यात आले ती प्रत्येक व्यक्ती पोलीस चकमकीत ठार झाली आहेत.