मुंबई : दिल्लीमध्ये राज्यसभा सदस्यत्त्वाची शपथ घेतल्यानंतर भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी ‘जय भवानी जय शिवाजी’ अशी घोषणा दिल्यानंतर सभापती व्यंकय्या नायडू यांनी समज देत केवळ शपथ घ्या घोषणा देऊ नका, असं म्हटल्यानंतर महाराष्ट्रात काही शिवभक्तांच्या भावना दुखावल्या. यानंतर व्यंकय्या नायडूंचा निषेध देखील महाराष्ट्रात करण्यात आला. पण आज गुरुवारी खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेत शिवाजी महाराजांचा अपमान झालेला नसल्याचे सांगितले.
खासदार उदयनराजे भोसले यांनी अपमान झाला नसल्याचे सांगत राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांनी केवळ राज्यघटनेला धरून असलेले नियम सांगितल्या स्पष्टीकरण दिले. दरम्यान शिवाजी महाराज यांच्या नावाने राजकारण करू नका असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केले आहे.
‘माझा स्वभाव पाहता शिवरायांचा अपमान झाला असता तर मीच तिथल्या तिथे राजीनामा दिला असता’ असं म्हणत उदयनराजे यांनी महाराष्ट्रात आंदोलन छेडण्याची भाषा करणार्यांना शिवरायांच्या नावाने राजकारण करू नका असं म्हटलं आहे.
यावेळेस उदयनराजे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांनादेखील टोला लगावला आहे. ‘महान व्यक्ती आहेत.’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान एकेकाळी आम्ही महाराजांच्या कुटुंबातील आहोत का? याचे पुरावे मागणारे आता आम्हांला या घटनेनंतर शिवरायांचा दिल्ली दरबारी अपमान का? हे कोण ठरवणार?याचा जबाब विचारत असल्याचं म्हटलं आहे. तर उदयनराजे यांनी व्यंकय्या नायडूंना पत्र पाठवणार्यांनी जरूर पत्र पाठवावीत, अशी प्रतिक्रिया देखील दिली आहे.
“मी उदयनराजेंच्या भावनांशी सहमत आहे. शिवाजी महाराजांच्या नावाने कुणीही राजकारण करू नये, महाराजांचा अपमान कुणी सहन करू नये. जय भवानी, जय शिवाजी या घोषणा याआधीही आंदोलनादरम्यान सभागृहात देखील आम्ही दिलेल्या आहेत. नायडू उपराष्ट्रपती आहेत. राज्यसभेचे सभापती आहेत. त्यामुळे ते नियमांचं काटेकोर पालन करतात. हा वाद वाढू नये, असं आम्हाला प्रामाणिकपणे वाटतं. शिवाजी महाराजांबद्दलच्या घोषणा घटनाबाह्य नाहीत, एवढंच आमचं म्हणणं आहे. यावर आता इतर राजकीय पक्ष काय भूमिका मांडत आहेत, यावर मला बोलायचं नाही”
संजय राऊत, खासदार, शिवसेना