सांगली : बत्तीस शिराळ्यात ऐतिहासिक नागपंचमीच्या उत्सवाची शेकडो वर्षाचा परंपरा आहे. माञ कोरोना महामारीमुळे यंदाच्या या उत्सवावर विरजण पडले. यंदाच्या नागपंचमी उत्सवानिमित्त ना बँजो वाजला ना मिरवणुका निघाल्या. प्रथेप्रमाणे फक्त पूजा आणि पालखी उत्सव काढून प्रथा अबाधित ठेवली.
शिराळ्यात पोलिसांच्या प्रचंड फौजफाटा उपस्थितीत अंबा माता पूजन, व पालखी पूजन करण्यात आले. या कालावधीत शिराळ्यात निरव शांतता होती. लाखोंच्या उपस्थिती, गजबजलेले माहोल यंदा शिराळ्यात दिसला नाही.
तुमचं हक्काचे ‘सुराज्य डिजिटल‘ फेसबुक पेज, ट्विटर आणि टेलिग्रामवरही उपलब्ध
सकाळी सम्राट सिंह शिंदे, संभाजी गायकवाड, पुजारी आनंदराव गुरव, व त्यांच्या पत्नी आणि सचिन कोतवाल या फक्त पाच जणांनी अंबा मातेचे पूजन केले. यावेळी मंदिर परिसर व शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. सकाळी अंबा माता मंदिरातील अंबा मातेचे पूजन झाल्यानंतर दुपारी अंबामाता मंदिर व लक्ष्मण महाजन यांचे घरी पालखी पूजन विधी पार पडला.
दुपारी तीन वाजता पालखी महाजनांच्या घरी पोहोचली. यावेळी लक्ष्मण महाजन यांच्या घरी पालखी पूजन झाले. अनिरुद्ध महाजन यांनी पालखी पूजन केले. यावेळी सुमंत महाजन, सुखदा महाजन, प्रणव महाजन, अनुजा महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. शासनाचे निर्देशानुसार पालखी सोहळ्यासाठी सम्राट सिंह शिंदे, संभाजी गायकवाड, पांडुरंग महाजन, श्रेयस महाजन, अथर्व महाजन, बाबासाहेब नलवडे, काशिनाथ नलवडे, अक्षय नलवडे, सागर कोतवाल, व संदीप कोतवाल यांनी पालखी सोहळ्याचे काम पाहिले.
या कालावधीत शिराळ्यात सर्वत्र शांतता होती. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. पोलीस, वनखाते, महसूल विभागाने, शिराळा परिसर व शिराळा शहरात मोठा बंदोबस्त तैनात केला होता. ड्रोन कॅमेराद्वारे सर्व प्रक्रियेवर नजर ठेवण्यात येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव व शासन निर्देश यामुळे शिराळकरांनीही शासन निर्देशांचे पालन करत प्रशासनाला सहकार्य केले. मात्र शेकडो वर्षांच्या इतिहासात शिराळा शहर आज वेगळेच दिसत होते हे वास्तव आहे.