बार्शी : येथील जना स्मॉल फायनान्स बँकेच्या शाखेत बनावट सोन्याचे दागिने ठेवून दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात शहर पोलिसांनी मूल्यांकनकार प्रविण भिमाशंकर महामुनी (रा. सनगर गल्ली, बार्शी ) यास अटक केली. त्याची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली.
महामुनी हा नाशिक येथील मिलींद पवार व्हॅल्युअर असोसिएटसचा बार्शी प्रतिनिधी होता. या प्रकरणातील ही चौथी अटक आहे. यापूर्वी पोलिसांनी दयानंद महामुनी या मूल्यांकनकारास व दोन कर्जदारास अटक केली आहे. त्यांचीही पोलिस कोठडी वाढली आहे.
या सर्व प्रकरणांमध्ये त्यांनी नकली दागिने वापरुन बँकेला चूना लावल्याचे उघड झाले आहे. बँकेतीलही काही कर्मचारी यामध्ये सामील असल्याचा संशय आहे, त्यादृष्टीनेही पोलिसांकडून तपास होत आहे.
* 148 कर्जदारांनी फसवणूक केल्याचे निष्पन्न
अटकेतील अरोपींच्या कोठडीतील चौकशीत फसवणुकीची पध्दत उघड झाली आहे. या कर्जदारांनी स्वत:बरोबरच आपले जवळचे नातेवाईक आणि मित्रांनाही अडचणीत आणले आहे. या कर्जदारांनी संगनमताने अनेक प्रकरणे करुन बँकेला लाखो रुपयांचा गंडा घातला असल्याचे निष्पन्न झाले आहे. तपासाधिकारी पो.उपनि. प्रेमकुमार केदार याबाबत सखोल चौकशी करत आहेत.
या पूर्वी अटक करण्यात आलेला मूल्यांकनकार दयानंद महामुनी हा ठाणे येथील अनिल एम. व्ही. वाघाडकर व्हॅल्युएटर्स कंपनीचा बार्शी प्रतिनिधी होता. या दोन मूल्यांकनकारांशी संगनमत करुन 148 कर्जदारांनी नकली दागिने सोन्याचे आहेत, असे भासवून बँकेत तारण ठेवून सुवर्ण तारण कर्ज उचलल्याचे समोर आले आहे.