नवी दिल्ली : बाबरी मशिद विध्वंस प्रकरणात भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी (वय ९२) यांचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जबाब शुक्रवारी नोंदविण्यात आला. सकाळी ११.०० ते जवळपास दुपारी ३.३० वाजेपर्यंत लखनऊच्या सीबीआयच्या स्पेशल न्यायालयासमोर आडवाणी यांनी आपला जबाब नोंदवला.
या दरम्यान लालकृष्ण आडवाणी यांना जवळपास १०० प्रश्न विचारण्यात आले. आडवाणी यांनी आपल्यावरील साऱ्या आरोपांना नाकारलंय. अयोध्येत १९९२ साली वादग्रस्त बांधकाम विध्वंस प्रकरणात लालकृष्ण आडवाणी यांचा जबाब नोंदवण्यात आला. या प्रकरणात लालकृष्ण आडवाणी हेदेखील एक आरोपी आहेत.
* ३१ ऑगस्टपूर्वी सुनावणी पूर्ण करायची
याअगोदर बाबरी मशीद विध्वंस प्रकरणात विशेष सीबीआय न्यायालयाने गुरुवारी भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी (वय ८६) यांचा जबाब नोंदविला. जोशी यांनी विशेष न्यायाधीश एस. के. यादव यांच्यापुढे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जबाब नोंदवला. या प्रकरणी ३२ आरोपींचे जबाब नोंदविण्यात येत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ३१ ऑगस्टपूर्वी सुनावणी पूर्ण करायची असल्यानं विशेष सीबीआय न्यायालयाकडून दररोज सुनावणी सुरू आहे. यापूर्वी भाजप नेत्या उमा भारती, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह यांचेही जबाब नोंदविण्यात आले आहेत. अयोध्येतील बाबरी मशीद सहा डिसेंबर १९९२ रोजी उद्ध्वस्त करण्यात आली होती.
* राम मंदिर भूमिपूजनास ३२ आरोपींना आमंत्रित करावे
अयोध्येत पाच ऑगस्ट रोजी होणाऱ्या राम मंदिर भूमिपूजन समारंभासाठी बाबरी मशीद उद्ध्वस्त प्रकरणातील सर्व ३२ आरोपींना आमंत्रित करण्यात यावे, अशी मागणी हिंदू धर्मसेना या हिंदुत्ववादी संघटनेचे अध्यक्ष संतोष दुबे यांनी गुरुवारी केली. या मुख्य ३२ आरोपींमध्ये दुबे यांचाही समावेश आहे. राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने या समारंभासाठी चारही शंकराचार्यांना आणि आंदोलनात बलिदान दिलेल्या कारसेवकांच्या कुटुंबीयांनाही या समारंभासाठी बोलवावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
* राम मंदिर भूमिपूजनाचा मुहूर्त चुकीचा
राम मंदिराच्या भूमिपूजनाचा ५ ऑगस्टचा मुहूर्त चुकीचा आहे,’ असा आक्षेप द्वारका पीठाच्या शंकराचार्यांनी घेतला आहे. ‘हिंदू पंचांगानुसार कोणतेही शुभ काम उत्तम काळ पाहून हाती घेतले जातं. पाच ऑगस्ट हा दिवस दक्षिणायनात येत असून, त्या दिवशीची तिथी भाद्रपद कृष्ण द्वितीया आहे. भाद्रपद महिन्यात घर किंवा मंदिरांचे बांधकाम वर्ज्य मानलं गेलंय’ असं शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी म्हटलं. विष्णू धर्मशास्त्र आणि दैवज्ञ वल्लभ ग्रंथ यांच्यानुसार भाद्रपद महिन्यातील बांधकाम नाशाला कारणीभूत होतं; त्यातून दारिद्र्य येतं. वास्तू प्रदीप ग्रंथातही असाच उल्लेख असल्याकडेही शंकराचार्यांनी लक्ष वेधलं आहे. काशी विद्या परिषदेचे प्रा. राम नारायण द्विवेदी यांनी मात्र शंकराचार्यांच्या मताचा प्रतिवाद केला आहे. ‘पाच ऑगस्टला अभिजित मुहूर्त असून, हरिशयनी एकादशी आणि देवोत्तम एकादशी यांचे लग्न यामुळे पवित्र कामे वर्ज्य असली तरीही पूजेला बंदी नाही,’ असे द्विवेदी यांनी म्हटलंय.