नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाशिकमधील कोरोनास्थितीचा आढावा घेतला. आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासह स्थानिक प्रशासनाने बैठक घेऊन, नाशिकमधील सद्यस्थितीवर मंथन केलं. यानंतर शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी शरद पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाचे निर्णय घेतल्याचं सांगितलं. ‘राज्यातील 3000 हेल्थ ऑफिसर सेवेसाठी उपलब्ध करणार आहोत. सर्व ऑडिटर्सला एक एक हॉस्पिटलची जबाबदारी देण्यात येईल. ऑडिटर्सने तपासणी केल्यानंतरच बिल रुग्णांना दिल जाईल’, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
* ऑडिटर्सने तपासणी केल्यानंतरच बिल रुग्णांना
राज्यातील 3000 हेल्थ ऑफिसर सेवेसाठी उपलब्ध करणार आहोत. खासगी रुग्णालये कोव्हिडची बिलं जास्त आकारतात अशा तक्रारी आहेत. त्याबाबत अत्यंत स्पष्ट सूचना आहेत, जे सरकारी ऑडिटर आहेत, या सर्व ऑडिटर्सला एक एक हॉस्पिटलची जबाबदारी देण्यात येईल. जे बिल हॉस्पिटल देईल ते आधी ऑडिटर्सकडे तपासणीसाठी जाईल. ऑडिटरने तपासल्यानंतर, महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत जी रुग्णालये ठरली आहेत, त्यातील उपचार मोफत होत आहेत की नाही, हे सगळं ऑडिटर तपासेल. त्यानंतर ते बिल रुग्ण आणि नातेवाईकांना दिलं जाईल. रिक्त जागांच्या बाबत मेरिटवर जागा भराव्यात आशा सूचना दिल्या आहेत. रिक्त जागांचा प्रश्न आज निकाली निघेल, असं राजेश टोपे म्हणाले.
* शरद पवारांचा फडणवीसांना सल्ला
लॉकडाऊनबाबत माझी काहीही भूमिका नाही. आरोग्यप्रमाणे आर्थिक संकट मोठं आहे. मुंबई उद्योगधंद्यात राहिलेली नाही. कामगार कोरोनाच्या भीतीने इतर राज्यात गेला, पण तो आता परत येण्यासाठी उत्सुक आहे. अर्थव्यवस्थेची काळजी घेणं गरजेचं आहे. कोरोना संकटाच्या काळात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अतिशय उत्तम काम करत आहेत. पण विरोधी पक्षनेते त्यांच्या विषयी राजकारण करत आहेत. फडणवीसांनी राजकारण करण्यापेक्षा कामात लक्ष घालून कोरोना दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत,” असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.