माढा : माढा तालुक्यात आज रविवारी एकूण 15 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. कुर्डूवाडी शहर आणि रिधोरे या तालुक्यातील गावे कोरोना हाॅटस्पाॅट बनू पाहत असल्याने प्रशासनासह तालुकावासियांच्या चिंतेत भर पडली आहे.
आजच्या कुर्डूवाडी शहरातील 8 आणि रिधोरे गावातील 7 व्यक्तींच्या समावेशाने तालुक्यात 119 कोरोनाबाधित झाले आहेत. एकट्या रिधोरे गावात आज अखेर 45 रुग्णांची संख्या झाली आहे. यामुळे हाॅटस्पाॅट बनलेल्या या गावात उद्या सोमवारी तहसीलदार राजेश चव्हाण यांच्यासह आरोग्य विभाग पंचायत समिती विभागाच्या कर्मचाऱ्यांना घेऊन विशेष मोहीम हाती घेणार आहेत.
(तुमचे हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि टेलिग्रामवरही उपलब्ध)
यामध्ये जास्तीत जास्त रॅपिड अॅटिजन टेस्ट घेतल्या जाणार आहेत. एकूणच कोरोनाची गावातील साखळी तोडण्यासाठी 10 दिवस पूर्णतः गाव बंद करण्याच्या तयारीत असल्याचे गटविकास अधिकारी डाॅ. संताजी पाटील यांनी सांगितले.
आजपर्यंत 485 जणांची रॅपिड अॅटिजन टेस्ट करण्यात आली. यामध्ये 31 अहवाल पाॅझिटीव्ह आले आहेत. स्वॅब पाठवलेल्या रुग्णांची संख्या 411 आहे. आतापर्यंत 42 रूग्ण बरे होऊन कुर्डूवाडी कोविड हेल्थ सेंटरमधून घरी गेले आहेत.आतापर्यंत तालुक्यात 3 रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहेत.
आजही माढा तालुकयातील 74 जण कुर्डूवाडी हेल्थ सेंटरसह सोलापूर बार्शी येथील खाजगी रूग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती गटविकास अधिकारी डाॅ पाटील यांनी दिली. कुर्डूवाडी सेंटरमधून आज तीन जण बरे झाल्याने घरी सोडले. यावेळी त्यांना सेंटरमधून पुष्पगुच्छ देत इतर रूग्णांनी निरोप दिला.