मुंबई : ऑटोरिक्षाचं स्टिअरिंग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे, पण कुठे जायचं हे मागे बसलेले ठरवतात, असा टोला विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
“उद्धव ठाकरे यांना आपल्या सर्वांच्या वतीने वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो, त्यांना आई भवानी दीर्घायुष्य देवो” अशा शुभेच्छा देत फडणवीसांनी भाषणाला सुरुवात केली. महाराष्ट्र भाजपच्या नव्या कार्यकारिणीच्या पहिल्या बैठकीत ते बोलत होते.
(तुमचे हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि टेलिग्रामवरही https://t.me/Surajyadigital उपलब्ध)
“आम्हाला सरकार पाडण्यात इंटरेस्ट नाही, पण किमान सरकार चालवून तर दाखवा. तुम्ही एकमेकांच्या तंगड्या तोडायला सक्षम आहात. हे जनतेने निवडून दिलेलं सरकार नाही, हे धोक्याने आलेलं सरकार आहे. आम्ही विरोधी पक्षाची भूमिका स्वीकारली आहे. तुमची जर दिशा चुकत असेल तर ते समोर आणणे आमचं काम आहे” असेही फडणवीस म्हणाले.
“कोरोना टेस्टिंग वाढवा आम्ही सांगत आहोत, मात्र आमचे मुख्यमंत्री सांगतात आम्ही सर्वात जास्त टेस्टिंग करत आहोत, पण महाराष्ट्र्र याबाबत 19 व्या क्रमांकावर आहे. मुंबईत टेस्ट होत नाहीत, कारण त्यावर निर्बंध घातले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीत लक्ष घातल्यानंतर मृत्यूदर कमी झाला आहे. सेकंड वेव्ह आली नाही, तर एका महिन्यात मुंबईत परिस्थिती आटोक्यात येऊ शकते” असा दावाही फडणवीसांनी केला.
हे सरकार पुण्यावर लक्ष देत नाही, पिंपरी चिंचवडला मदत देत नाही. तुम्ही जर मदत केली नाही तर लोकांना खूप अडचण आहे. आम्ही सरकारच्या सोबत आहोत मात्र ही लपवालपवी थांबवा, अशी ग्वाही देवेंद्र फडणवीसांनी दिली.
“काही झालं तर केंद्राकडे बोट दाखवायचं आणि केंद्राने पैसे दिले तर त्याचा वापर करायचा नाही. हे जे थोबाड फोडून बोलत होते की पीएम केअरचा पैसे नाही, मात्र आता आरटीआयमधून ही माहिती समोर आलीय” असेही फडणवीस म्हणाले.