सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात होणारी गर्दी टाळण्यासाठी 4 महिन्यांपासून सर्व देवस्थाने, प्रार्थना स्थळे बंद ठेवण्याचे शासन आदेश आहेत. अद्याप मंदिरे अनलॉक करण्याची परवानगी शासनाने दिलेली नाही. त्यामुळे पहिल्या श्रावणी सोमवारीही शहरातील सर्व मंदिरे बंद असल्याने भाविकांमध्ये नाराजी दिसून आली. भाविकांनी घराबाहेर न पडता घरातच शिवपूजा करावी, असे आवाहन या मंदिर संस्थानांकडून करण्यात आले. सिद्धेश्वर मंदिरासह अनेक मंदिरांनी फेसबूकद्वारे भक्तांसाठी ‘लाईव्ह’ दर्शन घडवून आणले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल‘ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि टेलिग्रामवरही उपलब्ध
दरवर्षी सोलापूर शहरात श्रावण महिना अत्यंत भक्तिभावाने साजरा करण्यात येत असतो. यंदा कोरोना परिस्थितीमुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे सोलापुरातील श्री सिद्धेश्वर महाराज, श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुन, श्री रेवणसिद्धेश्वर, मार्कंडेय यासारखी मंदिरे बंद आहेत. भाविकांनी मंदिरात न येता घरी बसूनच भक्ती करावी, असे आवाहन सर्वच मंदिर समितीकडून करण्यात आले आहे.
श्रावण महिन्यात श्री सिध्देश्वर मंदिरात रोज प्रसाद वाटप, प्रवचन व भजन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. तिसर्या व चौथ्या सोमवारी विशेष कार्यक्रमही घेण्यात येतात. शहरासह ग्रामीण भागातून विविध गावांतील पालख्यांसोबत भक्तगण पायी चालत सिद्धेश्वर मंदिरात येत असतात. यंदा कोरोना परिस्थितीमुळे शासनाने 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन निश्चित केला आहे. त्यामुळे यंदा श्रावण महिन्याच्या पहिल्याच सोमवारी भाविकांना दर्शन घेता आले नाही.
सिद्धेश्वर मंदिराप्रमाणेच बाळीवेस येथील श्री मल्लिकार्जुन मंदिर, विजापूर रोडवरील श्री रेवणसिद्धेश्वर मंदिर, कन्ना चौक परिसरातील जुने सिद्धेश्वर महाराज मंदिर व पंचकट्टा नजिकच्या श्री मार्कंडेय मंदिरातही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असतात. मात्र कोरोना परिस्थितीमुळे ही सर्व मंदिरे यंदा भक्तांसाठी बंद आहेत. कोरोना परिस्थितीमुळे भाविकही यंदा मंदिरात न जाता घरी बसूनच उपवास व भक्तीचा जागर करीत श्रावण महिना साजरा करण्यास पसंती देत आहेत.
* भक्तांसाठी लाईव्ह दर्शन
कोरोना परिस्थितीमुळे प्रशासनाच्या आवाहनानुसार भक्तांसाठी गेल्या काही महिन्यांपासून सिद्धेश्वर महाराज यांचे मंदिर बंद ठेवले आहे. मंदिर समितीच्या वतीने रोज मंदिरात पूजा-अर्चा होत असते. श्रावणी महिन्यातही विधिवत पूजा-अर्चा पंचकमिटीच्या वतीने येत आहे. मात्र यंदा कोरोना परिस्थितीमुळे भाविकांना मंदिरात दर्शन घेता येणार नाही. त्यामुळे मंदिर समितीच्यावतीने फेसबुकवर धार्मिक विधीचे लाईव्ह दर्शन करण्यात आले होते. भक्तांनी घरी बसूनच याचा लाभ घेतला. तर अनेक लिंगायत बांधवांनी घरातच सिद्धरामेश्वराच्या प्रतिमेची पूजा केली.