सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात रुग्णांना उपचार सुविधांची माहिती विनाअडथळा उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा परिषदेमध्ये कॉल सेंटर सुरू करण्यात यावे असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिले होते. त्यानुसार सांगली जि.प.मध्ये कॉल सेंटर सुरू झाले आहे.
जिल्हा परिषद सांगली येथे 0233 2374900, 0233 2375900 हे दूरध्वनी क्रमांक कार्यान्वित करण्यात आले आहेत. या क्रमांकांवर नागरिकांनी संपर्क साधल्यास त्यांना प्रशासनाने covid-19 च्या उपचारासाठी अधिग्रहित करण्यात आलेली हॉस्पिटल्स, त्यांचे संपर्क क्रमांक , त्याठिकाणी उपचारासाठी उपलब्ध असणाऱ्या बेडस्, ऍम्ब्युलन्स आदीबाबत सर्व ती माहिती त्वरित उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल‘ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
याबरोबरच गृह विलगीकरणामध्ये असणाऱ्या रुग्णांशी प्रतिदिन संवाद साधून त्यांना कोणत्या प्रकारचा त्रास होत आहे का तसेच त्यांच्या आरोग्याबाबतची माहिती घेण्यासाठी 0233 2377900, 0233 2378900 हे क्रमांक कार्यान्वित करण्यात आले आहेत. या क्रमांकावरून आलेले दूरध्वनी रुग्णांनी स्वीकारावेत व त्यावर विचारली जाणारी माहिती आरोग्य यंत्रणेला द्यावी, जेणेकरून गृह विलगीकरण यामध्ये असणाऱ्या रुग्णाला काही त्रास होत असल्यास पुढील उपचार त्वरित देता येतील, असे आवाहनही केले आहे.