मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात ट्वीट केल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. पार्थ पवार यांनी मराठा आरक्षणाबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे.
भाजप आमदार राम कदम यांनी पार्थ यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. तर पार्थ पवारांची ‘सत्यमेव जयते’कडे वाटचाल सुरू असल्याचं सूचक वक्तव्य करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आणखी सस्पेन्स वाढवला आहे. मात्र, पार्थ यांना भाजपत प्रवेश देणार का? यावर सावध भूमिका घेत अद्याप प्रस्ताव आला नाही, असं सांगत चंद्रकांत पाटील यांनी सावध पवित्रा घेतला.
पुणे पदवीधर निवडणूक मतदार नोंदणी अभियानाची आज सुरूवात झाली. चंद्रकांत पाटील आणि गिरीश बापट यावेळी उपस्थित होती. चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं की, पदवीधर, शिक्षक मतदार संघातील निवडणुका कोरोनामुळे कधी होतील, हे माहीत नाही. मात्र, भाजपनं तयारी सुरू केली आहे. निवडणूक जिंकता येणं हा उमेदवारीबाबत महत्त्वाचा निकष राहील, असंही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दरम्यान, पार्थ यांच्याबाबत सूचक आणि सावध बोलताना चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवरही कठोर शब्दांत टीका केली. मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढता येणं शक्य नाही. तसेच आरक्षण हा राज्याचा प्रश्न आहे. हे 50 वर्षे सक्रिय राजकारणात असणाऱ्या शरद पवारांना माहिती नाही. हे त्यांचं अज्ञान असं म्हणणं धाडसाचं ठरेल, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.