सोलापूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, संसर्ग कमी करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) लॉकडाऊनचे निर्बंध 31 ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आले आहेत. या काळात शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, शिकवणी वर्ग बंद, सिनेमागृहे, जलतरण तलाव, मनोरंजन केंद्रे, चित्रपटगृहे बंद राहणार आहेत. याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आदेश जारी केले आहेत.
यापूर्वी ज्या उपक्रमाला वेळोवेळी सशर्त परवानगी देण्यात आली होती, ते यापूर्वीप्रमाणे लागू राहतील. कोविड-19 व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय निर्देशाचे पालन करणे आवश्यक असून दोषीविरूद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सार्वजनिक, कामाच्या ठिकाणी आणि प्रवासामध्ये चेहऱ्यावर मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. सार्वजनिक ठिकाणी सहा फुटांचे सुरक्षित अंतर ठेवावे, पाचपेक्षा अधिक ग्राहकांना दुकानात येण्यास परवानगी देऊ नये. मोठ्या सार्वजनिक मेळाव्यावर बंदी असेल. विवाहस्थळी 50 नागरिकांना एकत्र येण्यास परवानगी असेल, अंत्ययात्रेला 20 नागरिकांना एकत्र येऊ शकतील. सार्वजनिक ठिकाणी थुकण्यास बंदी असून दारू, पान, गुटखा, तंबाखूचे सेवनावर कडक निर्बंध असणार आहेत, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
कामाच्या ठिकाणी जास्तीत जास्त आस्थापनांनी कर्मचाऱ्यांकडून घरातून काम करून घ्यावे. कार्यालये, दुकाने, मार्केट, औद्योगिक आस्थापनामध्ये कामाच्या वेळेत पुरेसे अंतर असावे. स्क्रिनिंग आणि स्वच्छता यावर भर द्यावा. शिफ्ट बदलताना वारंवार स्वच्छता, सॅनिटायझरचा वापर करावा. कामगारांमध्ये सुरक्षित अंतर असेल, याची खबरदारी घ्यावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
* हे सुरू राहणार
सर्व अत्यावश्यक सेवेची दुकाने/आस्थापना यापूर्वीच्या आदेशात नमूद केलेल्या निर्देशानुसार सुरू, यापूर्वी वेळोवेळी चालू करण्यास मान्यता दिलेले उपक्रम यापुढेही चालू राहणार आहेत. हॉटेल, फुड कोर्ट, रेस्टॉरंट, बार यांना 5 ऑक्टोबर 2020 पासून एकूण क्षमतेच्या 50 टक्के. स्थानिक प्रशासनाच्या मान्यतेनुसार परवानगी दिली आहे. दिलेल्या निर्देशांचे पालन करून राज्यातून सुरू होणाऱ्या व संपणाऱ्या सर्व रेल्वे तत्काळ सुरू होतील.