पुणे : अलीकडची मुलं काहीही ट्विट करतात. प्रत्येक वेळी तुमच्या मुलाने हे ट्विट केले, असे विचारले जाते, मला तेवढाच उद्योग नाही, राज्यातील अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या माझ्याकडे आहेत, अशा शब्दांत रोखठोक भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना मांडली.
पार्थ पवार यांनी केलेल्या ट्विटबाबत पत्रकारांनी आज अजित पवार यांना विचारणा केली. त्यावेळी अजित पवारांनी वैतागून हे उत्तर दिले.
पार्थ पवार यांनी मराठा आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा दिला असून त्यांच्या या भूमिकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी तरुणाने आत्महत्या केल्यानंतर पार्थ पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली. पुण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर अजित पवार पत्रकारांशी बोलत असताना त्यांना यासंबंधी विचारण्यात आलं. यावेळी त्यांनी प्रत्येकाला काय ट्विट करावं याचा अधिकार असतो असं सांगत ही राष्ट्रवादीची भूमिका नसल्याचं स्पष्ट केलं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
“ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका नाही हे आम्ही सांगितलेलं आहे. अलीकडची मुलं काही ट्विट करतात.
प्रत्येक वेळेस तुमच्या मुलाने हे ट्विट केलं विचारलं जातं, मला तेवढाच उद्योग नाही. राज्यातील अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या माझ्याकडे आहेत,” असं अजित पवारांनी म्हटलं.
पुढे त्यांनी सांगितलं की, “जो तो स्वतंत्र विचाराचा असतो, प्रत्येकाला काय ट्विट करावं याचा अधिकार असतो. माझी बहिण खासदार सुप्रिया सुळेंनी स्पष्टपणे सांगितलं आहे की, मराठा आरक्षण असेल, धनगर आरक्षण किंवा इतर घटकांचं आरक्षण असेल ज्याला त्याला आपल्या हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे अशी आमची भूमिका आहे”