लखनौ : राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी व ३५ खासदारांसह शेकडोच्या संख्येने पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते हाथरसच्या मार्गावर जमले होते. परंतु आता प्रशासनानं राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह पाच जणांना हाथरसला जाण्याची परवानगी दिली असल्याची माहिती समोर आली आहे.
उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील सामूहिक बलात्काराचे प्रकरण आता प्रचंड तापले आहे. विरोधकांनी उत्तर प्रदेश सरकारला धारेवर धरले असून, याच पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा काँग्रेस नेते राहुल गांधी पीडितेच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी दिल्लीवरून हाथरसकडे रवाना झाले होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी यापूर्वी हाथरस प्रकरणातील पीडित तरूणीच्या कुटुंबीयांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांना त्यावेळी रोखण्यात आलं होतं. त्यानंतर आज पुन्हा त्यांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, प्रशासनाचा निषेध करण्यासाठी काँग्रेसचे अनेक खासदार आणि कार्यकर्ते त्या ठिकाणी जमले होते. परंतु आता प्रशासनानं राहुल गांधी, प्रियंका गांधींसह पाच जणांना हाथरसला जाण्याची परवानगी दिली आहे.
हाथरसला जाताना प्रियंका गांधी स्वतः कार चालवत होत्या. तसंच त्यांच्या सोबत राहुल गांधीही आहेत. त्यांच्या गाडीच्या मागे वाहनांचा भला मोठा ताफा होता. राहुल व प्रियंका गांधी हे हाथरसकडे रवाना होताच, उत्तर प्रदेश पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर फौजफाटा वाढवला होता. तर, विविध ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक होत, रस्त्यांवर उतरल्याचे दिसून आलं होतं.
यमुना एक्स्प्रेस वेवर जागोजागी पोलिसांचा मोठा बंदोबस्तही केला होता. या अगोदर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत हाथरस येथे जाणार असल्याची माहिती दिली होती. “जगातील कोणतीही ताकद मला हाथरस येथील दुःखी कुटुंबाला भेटण्यापासून रोखू शकत नाही,” असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं होतं.