लखनौ : हाथरस येथील सामूहिक बलात्काराच्या घटनेतून देश अद्याप सावरलेला नाही, तोच उत्तर प्रदेशमधून आणखी एक बलात्काराची घटना समोर आली आहे. अशा घटना दररोज समोर येत आहेत. मेरठमधील एका आठ वर्षीय चिमुरडीवर तिच्या शेजारी राहणाऱ्या 16 वर्षीय मुलाने बलात्कार केला असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेरठमध्ये एकाच आठवड्यात बलात्काराची दुसरी घटना घडली आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारी उत्तर प्रदेश राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये बसचा चालक आणि वाहक या दोघांनी मिळून एका 35 वर्षीय महिलेवर बलात्कार केला होता. दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मेरठमध्ये यावर्षी 31 ऑगस्टपर्यंत तब्बल 36 बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. गेल्या वर्षी मेरठमध्ये तब्बल 99 बलात्काराच्या घटना घडल्या होत्या.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सदर मुलगी तिच्या घराजवळच्या परिसरात खेळत असताना अल्पवयीन आरोपीने मुलीला स्वतःच्या घरी नेले. तिथे तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
अल्पवयीन आरोपी मुलीला घराच्या छतावर घेऊन गेला. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करुन तो तिथून पळून गेला. दरम्यान आजू-बाजूला राहणाऱ्या लोकांनी मुलीचा आवाज ऐकून आरोपीच्या घराकडे धाव घेतली. परंतु तोवर उशीर झाला होता. पोलिसांनी सांगितले की, पीडित मुलगी गंभीर अवस्थेत असताना तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच पीडितेची मेडिकल चाचणी केली जाणार आहे.