हाथरस : पोलिसांनी प्रियांका गांधींचा कॉलर पकडलेला फोटो सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या फोटोवर काँग्रेस कार्यकर्ते आणि नेते आक्रमक झाले आहेत. तसंच सोशल मीडियावर देखील यूपी पोलिसांच्या वागणुकीवर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.
यूपी पोलिसांनी काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधींची कॉलर पकडल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 1 ऑक्टोबर रोजी काँग्रेस नेते राहुल गांधींची देखील यूपी पोलिसांनी कॉलर पकडली होती तसंच त्यांना धक्काबुक्की केली होती. 3 ऑक्टोबरला पुन्हा एकदा यूपी पोलिसांनी प्रियांका गांधींची कॉलर पकडून बेशिस्त वर्तन केलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी हा फोटो ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. ‘भाजपवालो तुम्हे करारा जवाब मिलेगा’, असा इशारा त्यांनी दिला. सत्यजीत तांबे म्हणाले, “आपल्याच आई बहीणीवर असा जर प्रसंग आला तर आपण सहन करू का? अतिशय असंवेदनशील पद्धतीने यू.पी. सरकार आणि पोलिस हाथरस प्रकरण हाताळत आहेत. आज प्रियांका गांधी यांचा कॉलर पकडलेला जो फोटो व्हायरल होतोय, हे कोणताही काँग्रेस नेता आणि कार्यकर्ता सहन करू शकत नाही”
दुसरीकडे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीही याप्रकरणी नाराजी व्यक्त करत योगी सरकारला सुनावलं आहे. योगीजी आपल्याकडे महिला पोलिस नाहीत का? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.
राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि काही काँग्रेस कार्यकर्ते पीडित कुटुंबीयांच्या भेटीला दिल्लीवरून हाथरसकडे निघाले होते. मात्र पोलिसांनी त्यांना रोखून धरलं. पीडित कुटुंबाची भेट घेऊ दिली नाही. तसंच पोलिसांनी राहुल गांधी यांची कॉलर पकडून त्यांना धक्काबुक्की केली. यानंतर काँग्रेस कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले होते.
यूपी पोलिसांनी राहुल गांधी यांना दिलेल्या वागणुकीच्या निषेधार्थ संपूर्ण देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलने केली. मुंबईत देखील वरिष्ठ काँग्रेस नेत्यांनी आंदोलन करत यूपी सरकारचा निषेध व्यक्त केला.