सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षेला आज सोमवारपासून सुरुवातीला एटीकेटीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेपासून सुरुवात झाली. नऊ हजार 794 एटीकेटीच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यापैकी सोमवारी रात्री सात वाजेपर्यंत आठ हजार 500 विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे परीक्षा दिल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक श्रेणिक शहा यांनी दिली.
यंदा कोरोना संसर्गामुळे विद्यापीठाच्या पारंपरिक व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा या ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने घेतल्या जात आहेत. सोमवारी पारंपारिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या एटीकेटीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा पार पडली. विद्यार्थ्यांनी घरी बसून ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा दिली. सोमवारी रात्री नऊ वाजेपर्यंत ही परीक्षा पार पडली. रात्री सात पर्यंत आठ हजार 500 विद्यार्थ्यांची यशस्वी पद्धतीने परीक्षा पार पडली. तर शहर व ग्रामीण भागातील एकूण 74 विद्यार्थ्यांनी ऑफलाइन पद्धतीने ही परीक्षा दिली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
ऑनलाइन परीक्षा देताना विद्यार्थ्यांना सर्वर डाऊन कारणास्तव कोणतीही अडचण होऊ नये, यासाठी रात्री उशिरापर्यंत विद्यापीठाची पोर्टल व लिंक ओपन ठेवण्यात आली होती. तरीही ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा तांत्रिक कारणास्तव राहून गेली आहे, अशांसाठी 25 ऑक्टोबरनंतर पुन्हा परीक्षा घेण्यात येईल, असे विद्यापीठ प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
* तांत्रिक अडचणी, वेळ वाढवून दिला
सोलापूर विद्यापीठाने परीक्षेला सुरवात केली, मात्र तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थी वैतागले आहेत. आता यावर तोडगा म्हणून विद्यापीठाने परीक्षेचा वेळ वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे. वालचंद कॉलेजमधील अक्षय राजेंद्र बंडगर व अक्षय संजय होटकर या विद्यार्थ्यांनी तांत्रिक अडचणींबद्दल महाविद्यालयातील प्राध्यापकांशी संपर्क साधला आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार बॅकलॉग व एटीकेटीच्या विद्यार्थ्यांना पेपर देताना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या मनात आता भिती निर्माण झाली असून त्यांना नापास होईल की काय, असे वाटत आहे. विद्यापीठाने या विद्यार्थ्यांसाठी ‘एमसीक्यू’चे 50 प्रश्न दिले असून त्यासाठी 90 मिनीटांचा वेळ दिला आहे. मात्र, विद्यापीठाने दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर अवघा 13 मिनिटांचाच वेळ असल्याचे दिसत आहे. उर्वरित वेळ तांत्रिक अडचणींमुळे buffring ध्ये गेल्याचे दिसत आहे. विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी दिलेल्या हेल्पलाईनवरुन काहीच प्रतिसाद मिळत नसल्याचेही विद्यार्थी सांगू लागले आहेत. दरम्यान, पेपर सोडविल्यानंतर उत्तरपत्रिका सबमिट होत नसल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षेला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. 90 टक्के विद्यार्थ्यांची परीक्षा यशस्वीपणे पार पडली आहे. रात्री नऊ पर्यंत ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेतली गेली. तांत्रिक कारणास्तव ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा राहिली असेल, अशा विद्यार्थ्यांसाठी 25 ऑक्टोबर नंतर पुन्हा परीक्षा घेतली जाईल. एकाही विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही.
डॉ. मृणालिनी फडणवीस, कुलगुरू