लखनौ : उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे एका दलित मुलीवर सामूहिक बलात्कार करुन अमानुष मारहाण झाल्यानंतर संबंधित पीडितेचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून संबंध देशात या विषयावरुन नाराजी पसरली असताना आता युपीमधील बारांबकी जिल्ह्यातील भाजप नेत्याने या प्रकरणावर संतापजनक वक्तव्य केलं आहे.
बाराबंकी जिल्ह्यातील या भाजप नेत्याचे नाव आहे रंजीत बहादुर श्रीवास्तव, असे आहे. या अमानुष घटनेने अख्खा देश संताप व्यक्त करीत असताना उत्तर प्रदेश येथील सत्ताधारी तसेच केंद्रातील सरकार असणा-या भाजपा सरकारचे प्रतिनिधित्व करणा-या या नेत्याने आपले अकलेचे तारे तोडले आहेत. यावरुन सध्या संताप व्यक्त केला जात आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी ट्विट करत श्रीवास्तव हे आदिम आणि सडक्या मानसिकतेचे आहेत, अशी टीका केली. यांना कोणत्याही पक्षाने नेतेपद देऊ नये. यांना मी नोटीस पाठवणार असल्याचेही त्या म्हणाल्या.
* काय म्हटले भाजपा नेत्याने
हाथरसच्या पीडितेवर बोलताना या नेत्याने आरोपींना क्लिन चीट देऊन टाकली. “पीडितेसारख्या मुली बाजरीच्या, ऊसाच्या शेतातच का मरतात? कारण त्यांची मरण्याची तिच जागा आहे.”, असे लाजिरवाणे आणि डोक्याला झिणझिण्या आणणारे वक्तव्य या नेत्याने केले आहे. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे तो अनेकदा चर्चेत आलेला आहे.
* आरोपींना निरपराध करुन टाकले
श्रीवास्तव यांची पत्नी सध्या भाजपकडून नगरपालिकेची अध्यक्ष आहे. श्रीवास्तव यांच्यावर देखील लैंगिक शोषणाचे आरोप होते. आता तर त्यांनी हाथरसच्या आरोपींना निरपराध जाहीर करुन टाकले आहे. तसेच या आरोपींना त्वरीत सोडून दिले पाहीजे. जर चौकशीत हे आरोपी निर्दोष निघाले, तर तुरुंगात त्यांचे तारूण्य वाया जाईल, मग त्याची भरपाई कोण देणार? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. श्रीवास्तव यांचा हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. लोकांनी त्यांना जबरदस्त ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
* भाजप नेत्याचा व्हिडिओ आणि वक्तव्य
पीडित मुलीनेच मुलांना बाजरीच्या शेतात बोलवले असणार कारण त्यांच्यात प्रेमसंबंध होते. ही बाब आता सोशल मीडियावर पसरली आहे. या अशा मुली ऊस, तूर, मका किंवा बाजरीच्या शेतातच का मरतात? किंवा झुडुपात, जंगलातच मेलेल्या का आढळतात? तिथेच त्या का जातात. या मुली तांदूळ, गहूच्या पिकात मेलेल्या का आढळत नाहीत? असे प्रश्न श्रीवास्तव यांनी उपस्थित केले आहेत.
तसेच उंच पिकामध्ये अशा मुली फरफटत नेलेल्या नसतात. मृत्यूच्या ठिकाणी फरफटत नेल्याचे कोणतेही पुरावे आढळत नाहीत. मग असे कुकर्म त्याच जागेवर का होतात. अशा प्रकरणांचा तपास आता पुर्ण देशात झाला पाहीजे.