पुणे : चाकण-शिक्रापूर रोडवर शेल पिंपळगाव येथे पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने 20 कोटी रुपयांचे मेफेड्रॉन (एमडी) ड्रग्ज पकडले. त्यामध्ये पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. हे पाच आरोपी पिंपरी-चिंचवड शहरातून मुंबईच्या दिशेने जात होते. त्याची विक्री कुठे आणि कुणाला करणार होते, याबाबत अद्याप खुलासा झालेला नाही.
चेतन फक्कड दंडवते (वय 28, रा.मलठण-आंब्रेवस्ती, ता. शिरुर) आनंदगीर मधुगिर गोसावी (वय 25, रा. जि. जळगाव. सध्या रा. अकोले, शिरुर), अक्षय शिवाजी काळे (वय 25, रा. पाचर्णे मळा, ता. शिरुर), संजिवकुमार बन्सी राऊत (वय 44, रा.झारखंड, सध्या रा. उत्तरप्रदेश), तौसिफ हसन मोहम्मद तस्लीम (वय 31, रा. मुजफ्फरनगर. सध्या रा. नोएडा) अशी अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींची नावे आहेत.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शहरात होणा-या अंमली पदार्थांच्या गैरव्यवहाराला आळा घालण्यासाठी पोलिसांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार गुन्हे शाखेचे अंमली पदार्थ विरोधी पथक काम करत आहे. बुधवारी पथक प्रमुख पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांना माहिती मिळाली की, चाकण शिक्रापूर रोडने निळ्या रंगाची फॉक्सवेगन पोलो कार (एम एच 12 / एम एल 4716) जात आहे. तिच्यामध्ये अंमली पदार्थ आहेत.
या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या पोलिसांनी चाकण-शिक्रापूर रोडवर शेल पिंपळगाव, मोहीतेवाडी, धावरदरा परिसरात सापळा लावला. पोलिसांनी आरोपीच्या कारचा पाठलाग करून एका हॉटेलसमोर तिला गाठले. कारमध्ये पाचजण होते. चेतन हा कार चालवत होता. त्याच्या बाजूला आनंदगीर बसला होता. तर अन्य तिघे मागच्या बाजूला बसले होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
चेतनकडे असलेल्या पिशवीत आणि अक्षय, संजीवकुमार, तौसीफ यांच्याकडे असलेल्या ट्रॅव्हलींग बॅगमध्ये तब्बल 20 किलो मेफेड्रॉन (एम डी) ड्रग्ज आढळून आले. या ड्रग्जची किंमत 20 कोटी रुपये एवढी आहे. पोलिसांनी 20 कोटी रुपयांचे मेफेड्रॉन (एम डी) ड्रग्ज, 5 लाख रुपयांची कार आणि 23 हजार 100 रुपये रोख रक्कम आरोपींकडून हस्तगत केली.
* कामगार नगरीत इतका मोठा ड्रग्जसाठा
बॉलीवूडमधील ड्रग्ज कनेक्शन उघडकीस आले आहे. त्यामध्ये अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश असल्याचे सामोर आले आहे. पोलिसांकडून त्यांची चौकशी करून कारवाई देखील केली जात आहे. ही चर्चा सुरु असतानाच पिंपरी-चिंचवड सारख्या कामगार नगरीत देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज मिळणे ही धक्कादायक बाब आहे. आरोपींनी हे ड्रग्ज कुठून आणले, ते कुठे आणि कुणाला विकणार होते याबाबतची चौकशी पिंपरी-चिंचवड अंमली पदार्थ विरोधी पथक प्रमुख पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ करीत आहेत.