कोलकाता : कोलकाता येथील रस्त्यावर आज गुरुवारी भाजप कार्यकर्ते आणि पश्चिम बंगाल पोलिसांमध्ये संघर्ष झाला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कार्यालयाच्या दिशेने निघालेल्या मोर्चाला पोलिसांनी बॅरिकेड्स लावून अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर हिंसक वळण लागले.
मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडे निघालेल्या भाजप कार्यकर्त्यांविरोधात पोलिसांनी अश्रूधूर आणि पाण्याचा मारा केला. भाजपकडून आज राज्यभर ‘नाबन्ना चलो’ आंदोलन पुकारण्यात आले आहे. भाजप युवा मोर्चाचे नवे प्रमुख तेजस्वी सूर्या खास या आंदोलनात सहभागी होण्यासाठी कोलकाता येथे दाखल झाले होते.
राज्यातील ढासळत्या कायदा-सुव्यवस्थेचा निषेध नोंदवण्यासाठी गुरुवारी कोलकाता, हावडा येथून भाजपचे हजारो कार्यकर्ते नाबान्नाच्या दिशेने निघाले होते. बंगाल पोलिसांनी हा मार्च मध्येच अडवला. भाजप कार्यकर्ते बॅरिकेड हटवून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी पोलिसांनी मोर्चावर लाठीचार्ज सुरु केला.
भाजप नेत्यांनी पोलिसांवरच आरोप केला आहे. आमचे कार्यकर्ते शांततेत मोर्चा घेऊन जात होते. कार्यकर्त्यांवर दगडफेक करण्यात आली. ममता सरकारने जाणूनबुजून आमच्या लोकांवर लाठीचार्ज केला, असा आरोप भाजपने केला. पोलिसांबरोबर झालेल्या या संघर्षात भाजपचे अनेक नेते जखमी झाले. राज्यातील ढासळत्या कायदा-सुव्यवस्थेचा निषेध नोंदवण्यासाठी गुरुवारी कोलकाता, हावडा येथून भाजपचे हजारो कार्यकर्ते नाबान्नाच्या दिशेने निघाले होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
हावडा जिल्ह्यातील संत्रागच्ची येथे भाजपा कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पाण्याचा जोरदार फवारा मारण्यात आला, अश्रूधुराच्या नळकांडया फोडण्यात आल्या. प्रदेश भाजप उपाध्यक्ष राजू बॅनर्जी आणि खासदार ज्योर्तिमय सिंह माहातो जखमी झाल्याचे समजते.