लातूर : सहा महिन्यांपासून बंद असलेली लातूर-मुंबई रेल्वे आता रविवारपासून सुरू होत आहे. आठवड्यातून चार दिवस ही रेल्वे धावणार आहे. या संदर्भात रेल्वे बोर्डाने नोटीफिकेशनही काढले आहे. ही रेल्वे सुरू होत असल्याने लातूरहून मुंबई, पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय झाली आहे.
कोरोनाचा पार्श्वभूमीवर मार्चपासून लातूर-मुंबई रेल्वे बंद करण्यात आली होती. सहा महिन्यांपासून ही रेल्वे बंदच होती. केंद्र शासनाने गेल्या महिन्यापासून अनलॉक प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे रेल्वे बोर्डाने पहिल्या टप्प्यात देशात काही लांब पल्ल्याच्या रेल्वे सुरू केल्या आहेत. टप्प्या-टप्प्याने रेल्वे सुरू केल्या जात आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यात आता लातूर-मुंबई ही रेल्वे सुरू होत आहे. ता. ११ आक्टोबरला मुंबईहून ही रेल्वे निघणार आहे. ता. १२ आक्टोबरला येथून ती मुंबईला जाणार आहे. आठवड्यातून सोमवार, मंगळवार, बुधवार व शुक्रवार असे चार दिवस ही रेल्वे धावणार आहे. आतापर्यंत ही रेल्वे आठवड्यातून तीन दिवस बिदरपर्यंत जात होती. पण, सध्या तरी ती बिदरपर्यंत जाणार नाही. केवळ मुंबई ते लातूर अशी धावणार आहे. अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्याने मुंबई, पुण्याचे व्यवहार सुरू झाले आहेत. त्यात आता दसरा दिवाळी सण येत आहेत. त्यामुळे ही रेल्वे सुरू होत असल्याने प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.