पुणे : मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनावर भाष्य करताना आज, वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी एक राजा बिनडोक असल्याची जहरी टीका केली आहे. विशेष म्हणजे त्यावेळी आंबेडकर यांनी कोणाचेही नाव घेतले नाही. दरम्यान, मराठा आरक्षणासाठीच्या 10 तारखेला होणाऱ्या बंदला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा असल्याचंही त्यांनी जाहीर केलं आहे. प्रकाश आंबेडकर कोणाला बिनडोक राजा म्हणाले, यावरून सद्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
* मराठा आणि ओबीसी आरक्षण वेगळे
अॅड. आंबेडकर आज गुरुवारी पुण्यात होते. त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी मराठा आरक्षण आंदोलनावर स्पष्ट मते व्यक्त केली. या पत्रकार परिषदेत मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत ओबीसी गटातून मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी केली जाणार नाही, याची काळजी घेतली जावी. आणि दोन्ही समाजांनी आपापल्या भूमिकेवर ठाम राहावे, असे प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
* सामंजस्य बिघडू नये यासाठी बंदला पाठिंबा
भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनाही प्रकाश आंबेडकर यांनी फटकारले. मराठा समाजाला आरक्षण नाही तर सर्वांचेच आरक्षण रद्द करा, अशी बिनडोक भूमिका त्यांनी मांडली. भाजपने अशा नेत्याला राज्यसभेत पाठवलेच कसे, असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला. खासदार छत्रपती संभाजीराजे हे आरक्षणापेक्षा इतर मुद्द्यांवर अधिक भर देत असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. तसेच मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण याबाबत काळजी घ्यायला हवी असेही ते म्हणाले. सुरेश पाटील यांनी आम्हाला पाठिंब्यासाठी संपर्क साधला, असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राचे सामंजस्य बिघडू नये यासाठी बंदला पाठिंबा देत आहोत, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* शांत वातावरणाला पेटवण्याचं काम करू नये
अनेक मराठा समाजाचे कार्यकर्ते चांगले आहेत, महाराष्ट्र घडवलेला असे राज्यकर्ते आहेत, नेतृत्वाचा विषय त्यांचा आहे. आरक्षणाचा मुद्दा विचलित करण्याचा प्रयत्न काही जणांचा आहे, ज्यांना घटना माहिती नाही, त्यांनी बोलू नये, आरक्षण हे घटनेने दिले आहेत, ज्यांना आरक्षण दिलंय त्यांच्याशी उघड भांडण करायचं आहे का? मराठा समाजाचे मोर्चे निघाले तसे ओबीसी समाजाचे निघाले होते, तेव्हा मी शांत राहण्याचं आवाहन केलं अन्यथा महाराष्ट्रात यादवी निर्माण झालं असतं, त्यामुळे शांत असलेल्या वातावरणाला पेटवण्याचं काम करू नये, स्वत:चं अस्तित्व राखण्यासाठी जातीचा वापर केला जातोय, अशी टीकाही प्रकाश आंबेडकरांनी केली.
* एक राजा बिनडोक तर दुसरा …
दोन्ही राजांचा बंदला पाठिंबा आहे असं कुठेही वाटलं नाही, एक राजा बिनडोक आहे, तर दुसरे संभाजीराजे त्यांनी भूमिका घेतली हे बरोबर आहे परंतु त्यांनी इतर मुद्द्यावर भर देतायेत. घटना कळत नसताना भाजपानं राज्यसभेवर पाठवलं कसं? हा प्रश्न उपस्थित होतो, संभाजीराजे आरक्षण सोडून इतर मुद्द्यावर जास्त भर देतात अशा शेलक्या शब्दात प्रकाश आंबेडकरांनी संभाजीराजे आणि नाव न घेता उदयनराजेंवर टीका केली आहे. तसेच मी कोणाला अंगावर घेण्याला घाबरत नाही असंही त्यांनी सांगितले.