भंडारकवठे : विंचूर ( दक्षिण सोलापूर ) येथे पत्ते खेळण्याच्या किरकोळ भांडणावरून एका तरुणाला जबर मारहाण करण्यात आली. यामध्ये या तरुणाचा आज शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. याप्रकरणी शंकरनगर येथील तीन जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला असून तिघांनाही मंद्रुप पोलिसांनी अटक केली आहे.
नागनाथ सुरेश साबळे (वय २८ रा.विंचुर ,तालुका दक्षिण सोलापूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. गुरुनाथ भीवा पवार, प्रवीण गुरुनाथ पवार व सुनील गुरुनाथ पवार ( तिघेही रा. शंकरनगर तालुका दक्षिण सोलापूर) असे खून केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
याबाबतची माहिती अशी की, मयत नागनाथ सुरेश साबळे व आरोपी प्रवीण पवार यांच्यामध्ये विंचूर येथील जिल्हा परिषद शाळेत पत्ते खेळताना बुधवारी पाच वाजता भांडण झाले. त्यानंतर प्रवीण पवार यांनी शंकरनगर येथे जाऊन वडिलांना भावाला याची माहिती दिली. विंचूर येथील इंदिरा नगर जवळ सायंकाळी जबर मारहाण केली. आज सकाळी नागनाथ साबळे यास जास्त त्रास होऊ लागला. उपचारास घेऊन जाण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी प्रभाकर शिंदे, मंद्रुपचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन थेटे, पीएसआय गणेश पिंगूवाले यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. तीनही आरोपींना पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी भाऊ सचिन सुरेश साबळे यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी प्रभाकर शिंदे करीत आहेत.