पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून पवारांवर टीका करताना दुसऱ्यांदा बापाचा उल्लेख करण्यात आलाय. दोनच दिवसांपूर्वी अजित पवारांना उद्देशून आम्ही तुमचे बाप आहोत, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. आज दुस-यादा पुण्यातच चंद्रकांत पाटलांनी पुन्हा अजित पवारांचा बाप काढला.
आज पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील वरवंडपासून चौफुल्यापर्यंत एका ट्रॅक्टर रॅलीचे भाजपतर्फे आयोजन करण्यात आलं होतं. केंद्र सरकारने संमत केलेल्या तीन कृषी विधेयकांचं समर्थन करण्यासाठी आणि ही विधेयके शेतकऱ्यांना कशी फायदेशीर आहेत हे सांगण्यासाठी या ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे अनेक नेते या रॅलीत सहभागी झाले होते. या रॅलीसाठी शेकडो ट्रॅक्टरची रांग पुणे-सोलापूर महामार्गावरती भाजपने लावली होती. वरवंडहून निघालेल्या या ट्रॅक्टर रॅलीचा समारोप चौफुला या ठिकाणी झाला आणि तिथं या रॅलीचं रूपांतर सभेमध्ये झालं.
सभेत भाषण करताना चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारने कृषी विधेयकांच्या अंमलबजावणीला दिलेल्या स्थगिती बद्दल राज्य सरकारवर टीका केली. शेतकऱ्यांकडून फक्त सेस गोळा करण्यासाठी या विधेयकाला विरोध होत असल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केला. भाजप या स्थगितीच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असून ही स्थगिती उठवली जाईल, असा दावा यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केला. मात्र ते यावरच थांबले नाहीत तर राज्य सरकारने कृषी विधेयकाच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्यानंतर लगेचच बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने फतवा काढला आणि बाजार समितीच्या आवाराच्या बाहेर देखील शेतकऱ्यांकडून सेस गोळा केला जाईल, असं जाहीर केलं. यांच्या बापाची पेंड आहे का असं, यावेळी चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आणि पवारांना उद्देशून पुन्हा एकदा बापाचा उल्लेख केला.
* चंद्रकांत पाटील यांनी याबद्दल बोलण्याचे टाळले
शनिवारी पुण्यातच भाजप पदाधिकाऱ्यांच्या एका मेळाव्यात भाषण करताना चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना उद्देशून आम्ही तुमचे बाप आहोत, असं म्हटलं होतं. पुणे महापालिकेच्या प्रभाग समित्यांच्या निवडणुकीवरून चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांच्या बापाचा उल्लेख केला होता. प्रभाग समितीच्या 16 जागांपैकी 11 जागा सत्ताधारी भाजपने जिंकल्या, चार जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आल्या तर लकी ड्रॉ पद्धतीने चिठ्ठी टाकून काढलेली एक जागा काँग्रेसच्या पारड्यात पडली होती. मात्र काहीतरी जादू होऊन या सर्वच्या सर्व 16 जागा भाजपला मिळायला हव्या होत्या असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना काही स्वप्न पडत असतील, पण त्यांनी त्यांची एनर्जी वाया घालू नये. कारण आम्ही पण तुमचे बाप आहोत असं म्हटलं होतं. मात्र चंद्रकांत पाटील यांना याबाबत विचारलं असता त्यांनी याबद्दल बोलण्याचं टाळलं.