जळगाव : माजी आमदार उदयसिंह पाडवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश माझ्या आदेशानेच झाला आहे, असा गौप्यस्फोट भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. त्यांच्या गौप्यस्फोटाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
माझ्या सल्ल्यानेच भाजपाचे उदयसिंह पाडवींनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय हे खरंय. उदयसिंह पाडवी यांनी मला कोणत्या पक्षात प्रवेश करु असं विचारला होतं. त्यावर तुम्ही राष्ट्रवादीत प्रवेश करा, असा सल्ला मी त्यांना दिला, असं एकनाथ खडसे म्हणाले. तसंच अनेक सहकारी माझ्यावर विश्वास ठेवत पक्षांतर करतात, असं म्हणत खडसेंनी अप्रत्यक्षरित्या भाजपला इशारा दिला आहे.
एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून येत आहेत. त्यातच आता माजी आमदार उदयसिंग पाडवी यांनी केलेल्या गौप्यस्फोटाने आणि खडसेंनी देखील त्याला दुजोरा दिल्याने खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
* उदयसिंह पाडवींची कबुली
राष्ट्रवादीत प्रवेश केलेले भाजपाचे माजी आमदार उदयसिंह पाडवी म्हणाले, “ज्येष्ठ नेते आणि आमचे मार्गदर्शक एकनाथ खडसे यांच्या आदेशाने आणि सल्ल्याने मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला”. एकनाथ खडसेंनी देखील आपण त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश करण्यास सुचवलं असल्याचं मान्य केलं आहे. अनेक सहकारी आहेत, जे माझ्यावर विश्वास ठेवत पक्षांतर करतात, असं म्हणत खडसेंनी एकप्रकारे भाजपला इशाराच दिला आहे.
* आणखी भाजपात आहे : खडसे
खानदेशातील अनेक नेते आमदार आपल्या सोबत आहेत. मग ते देखील राष्ट्रवादीत जाणार आहेत का?, या प्रश्नावर ‘मीच अजून राष्ट्रवादीत गेलो नाही तर मी त्यांच्या प्रवेशावर काय बोलू’, असं खडसे म्हणाले. तसंच मी आणखी भारतीय जनता पक्षामध्ये आहे, असंही सांगायला खडसे विसरले नाही.
उदयसिंह पाडवी यांना खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्यास सांगितलेच आहे पण आणखी किती नेत्यांना आणि आमदारांना खडसेंनी पक्षांतराचा सल्ला दिलाय, हे देखील औत्सुक्याचं आहे. याचीही चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.