बेगूसराय : मला सतत देशद्रोही म्हणत असाल, तर मी भारतीय जनता पक्षात प्रवेश करीन, असे म्हणत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते आणि बिहार विधानसभा निवडणुकीतील पक्षाचे स्टार प्रचारक कन्हैया कुमार यांनी भाजपवर टीकेचे प्रहार केले आहेत.
बिहार विधानसभेला अजून काही कालावधी शिल्लक असला तरी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे स्टार प्रचारक कन्हैया कुमार मैदानात उतरले आहेत. कन्हैया कुमार यांनी आपला गृहजिल्हा बेगूसराय येथून आपले निवडणूक अभियानाची सुरुवात केली आहे. या दरम्यान कन्हैया कुमार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याच व्हायरल व्हिडिओत कन्हैया कुमार यांनी भाजपवर ही टीका केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कन्हैया कुमार यांनी बेगूसराय जिल्ह्यातील बखरी विधानसभा मतदारसंघातून सीपीआयचे उमेदवार सूर्यकांत पासवान आणि तेघडा येथील उमेदवार रामरतन सिंह यांचे नामांकन भरताना उपस्थित होते. नामांकनानंतर कन्हैया कुमार यांनी आयोजित सभेत भारतीय जनता पक्षावर टीकास्त्र सोडले. पूर्वी ईव्हीएम हॅक होत असे, आता तर भाजपचे लोक मुख्यमंत्र्यांनाच हॅक करत आहेत, असे कन्हैया कुमार म्हणाले.
कन्हैया कुमार म्हणाले की, ज्योतिरादित्य शिंदे हे जेव्हा काँग्रेसमध्ये होते तेव्हा ते अतिशय वाईट व्यक्ती होते. त्यांनी गंगेत डुबकी मारली तेव्हा पासून ते भाजपचे झाले. मी एके ठिकाणी बोललो आहे की मला जर तुम्ही सतत देशद्रोही-देशद्रोही म्हणाल… तर मी बोलेन की खबरदार… जर जास्तच बोललात तर मी भारतीय जनता पक्षात प्रवेश करीन. ज्यांना हे शिव्या देतात, ५ मिनिटानंतर ते काका म्हणायला सुरुवात करतात. कन्हैया कुमार यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.