सातारा : काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शेलक्या भाषेत टीका केली होती. सत्तेची स्वप्न पाहू नका, आम्हीही तुमचे बाप आहोत, असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते. बाप काढणा-यावरुन राज्यात आता चांगलेच राजकारण पेटले आहे.
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीनं सेस गोळा करण्याच्या केलेल्या घोषणेनंतर चंद्रकांत पाटलांनी त्यांच्यावर सडकून टीका केली होती. यांच्या बापाची पेंड आहे का?; अशा शब्दात चंद्रकांत पाटलांनी फटकारलं होतं. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात दोनदा पवारांचा बाप काढला. यावर आता राष्ट्रवादीतील कार्यकर्ते चांगलेच संतापले आहेत. यातूनच आता चंद्रकांत पाटील यांना फैलावर घेतले जात आहे.
यावर आता राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांनी चंद्रकांत पाटील यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘चंद्रकांतदादा, तुमच्या दिल्लीतील बापाला बाप म्हणायला वारसदार नाही आणि तुम्ही बाप काढायची भाषा सारखे करत आहात.
सध्या मुंबई आणि देशातील मोठ्या उद्योगपतींना स्वतःची मोठी बाजारपेठ बनवायची आहे. महाराष्ट्रात भाजपा ची आंदोलने चालू आहेत याचा बोलवता आणि करविता धनी कोण आहे? असा घणाघात शशिकांत शिंदे यांनी केला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तर, शेतकऱ्यांच्या फायद्याची गोष्ट यात नाही. जर असती तर आम्ही आनंदाने कृषी विधेयकाला पाठिंबा दिला असता. देशातल्या लाखो कामगारांना अन्यायकारक असे कमागार विधेयक आणले त्या विरोधात आंदोलन करण्याची इच्छा नाही झाली भाजपा ची ? अशी जोरदार टीका देखील शिंदे यांनी केली आहे.
दरम्यान, कृषी विधेयक आणि कामगार विधेयक हे मालक धार्जिणे आहेत. उद्योगपतींच्या साठी बाजारपेठ उभी करण्याचा मोदी सरकारचा निव्वळ हा अट्टाहास आहे. असा जोरदार टोला शशिकांत शिंदे यांनी लगावला आहे.