न्यूयॉर्क : ‘ऑस्कर’ जिंकण्याचे भारताचे स्वप्न पहिल्यांदा पूर्ण करणाऱ्या प्रख्यात वेशभूषाकार भानू अथैया यांचे निधन झाले. वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भानू अथैया यांच्या निधनाने कला विश्वातील समृद्ध परंपरा काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे.
भानू अथैया यांनी भारतासाठी पहिल्यांदा अकादमी अवॉर्ड अर्थात मानाचा ऑस्कर जिंकला होता. अथैया यांना 1983 मध्ये रिचर्ड अॅटनबरो दिग्दर्शित ‘गांधी’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट वेशभूषेसाठी पुरस्कार मिळाला होता. कॉश्च्युम डिझायनर म्हणून त्यांनी शंभरहून अधिक बॉलिवूडपटांसाठी काम केले आहे. आमीर खानचा ‘लगान’ आणि शाहरुख खानच्या ‘स्वदेस’ या सिनेमांसाठीही त्यांनी वेशभूषाकार म्हणून काम केले होते.
बुटीकमध्ये काम करत असताना त्यांची भेट कलाकारांसोबत होत होती. त्यांच्या डिझाईन अनेक कलाकारांना आवडल्यामुळे त्यांना चित्रपटासाठी कपडे डिझाईन करण्याची कामे मिळू लागली. 1955 साली आलेल्या गुरुदत्त यांच्या ‘सीआयडी’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या कामास सुरुवात केली. या चित्रपटाच्या यशानंतर त्यांना अनेक हिंदी चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. ‘कागज के फूल’, ‘चौदहवी का चांद’, ‘प्यासा’, ‘साहब बिबी और गुलाम’, ‘वक्त’, ‘तिसरी मंजिल’, ‘गाईड’, ‘लीडर’, ‘गंगा जमुना’, ‘जॉनी मेरा नाम’, ‘खिलौना’सारख्या अनेक प्रसिद्ध चित्रपटांसाठी त्यांनी काम केले. एकोणीसशे साठच्या दशकात टाइम्स ऑफ इंडियाच्या ‘ईव्ह्ज वीकली’मधील भानू यांची रेखाटने पाहून अभिनेत्री नर्गिस प्रभावित झाल्या. नर्गिस यांच्यामुळेच भानू यांना राज कपूरच्या ‘श्री 420’ च्या वेशभूषेचे काम मिळाले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. दरम्यानच्या काळात सत्येंद्र अथ्थैया यांच्याशी भानू यांनी विवाह केला आणि ‘भानुमती राजोपाध्ये’ ‘भानू अथ्थैया’ झाल्या.
त्यांनी डिझाईन केलेल्या वेशभूषा 60 आणि 70 च्या दशकात खूप गाजल्या. चुडीदारची फॅशनही त्यांच्यामुळेच ट्रेंडमध्ये आली. ब्रिटीश दिग्दर्शक रिचर्ड अॅटनबरो यांनी 1980 मध्ये महात्मा गांधींवर चित्रपट करण्याचे ठरवले. त्यासाठी ते भारतात आले. भारतात चित्रपट करणे इतके सोपे नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. इथली सामाजिक आणि धार्मिक परिस्थिती, इथला समाज याची माहिती आणि अभ्यास करण्यासठी त्यांनी भारतीय लोकांचीच मदत घेण्याचे ठरवले. त्याकाळातील पेहराव व्यवस्थित दिसावे यासाठी त्यांनी भारतीय वेशभूषाकारांचा शोध घेण्यास सुरुवात केली.
दरम्यानच्या काळात भानू अथ्थैयांना हिंदी चित्रपटक्षेत्रात काम करून 25 वर्षं झाली होती. त्यांनी ‘सिद्धार्थ’ या इंग्रजी चित्रपटासाठीदेखील काम केले होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* भानू अथैया यांची कारकीर्द
कोल्हापूरच्या अण्णासाहेब राजोपाध्ये यांच्या घरी 28 एप्रिल 1929 रोजी ‘भानुमती’चा जन्म झाला. कुटुंब कर्मठ आणि परंपरावादी असले तरी अण्णासाहेबांनी चौकट मोडत चित्रकलेच्या क्षेत्रात करिअर केले. वडिलांना चित्र काढताना पाहणं लहानग्या भानूला फार आवडे. चित्र काढून झाल्यावर बाबा तिला रंग, ब्रश साफ करायला सांगत. हे सगळं करत असताना चिमुकल्या भानूला चित्रकलेची गोडी लागली. वयाच्या नवव्या वर्षी भानुचे पितृछत्र हरपले आणि त्याच बरोबर तिने आपला चित्रकलेचा एकमेव गुरुही गमावला. मात्र तिची चित्रकलेतील रुची पाहून आई शांताबाईंनी तिला घरीच चित्रकला शिकवण्याची व्यवस्था केली. त्याकाळी स्त्रियांनी बाहेर जाऊन शिक्षण घ्यावे या गोष्टीला मान्यता नव्हती. त्याच दरम्यान त्यांनी ‘एकादशी महात्म्य’ या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले. घरीच चित्रकला शिकणाऱ्या भानुंना रेखाचित्र काढण्याची आवड होती.
शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढे त्यांनी चित्रकलेचे शात्रोक्त शिक्षण घेण्यासाठी त्यांनी मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये ‘फाईन आर्ट्स’ शाखेत प्रवेश घेतला. अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षी त्या सुवर्ण पदक पटकावत उत्तीर्ण झाल्या. शिक्षण घेत असताना त्या त्यांच्या चित्रांची प्रदर्शने भरवत होत्या. शिक्षण पूर्ण झाल्यावरसुद्धा त्या अशी प्रदर्शने आयोजित करत होत्या. त्यानंतर त्यांनी मासिकांमधून फॅशन इलीस्ट्रेटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. अनेक फॅशन बुटीकसाठी त्यांनी काम केले.