विरवडे बु : सीना नदीच्या पुराने पीरटाकळी (ता. मोहोळ) गावाला चारही बाजूंनी वेढा दिला आहे. मागील दोन दिवसापासून वीजपुरवठा ही खंडित असल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सुरक्षिततेचा उपाय म्हणून गावातील तीनशेहून अधिक व्यक्तींना कामती (खुर्द) येथे हलविण्यात आले असल्याची माहिती कामती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण उंदरे यांनी दिली. दरम्यान कामती पोलीस ठाण्यात कर्मचारी,सरपंच कालिंदी धुमाळ,युवा कार्यकर्ते महेश धुमाळ,पोलीस पाटील शंकर पाटील, मंडल अधिकारी बेलभंडारे , व गावातील जय महाराष्ट्र नवरात्र उत्सव मंडळच्या कार्यकर्त्यांनी तातडीने मदत कार्य सुरू केले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सीना नदीच्या अगदी काठावरील वसलेल्या या गावाला पुराच्या पाण्याचा नेहमीच सामना करावा लागतो. दरम्यान पीरटाकळी गावजवळच्या धुमाळ वस्ती, खंडागळे वस्ती, पाटील वस्ती, मेटकरी वस्ती,आदी भागाला काल रात्री आलेल्या पुराच्या पाण्याने वेढले आहे. गावाला जोडणाऱ्या अन्य मार्गावरील मुख्य रस्त्यावर पुराचे पाणी आहे. सध्या एकच मार्ग असून तो मार्गही वाहतुकीला अयोग्य झाला आहे. त्यामुळे प्रशासनाला मदतकार्याला अडथळा निर्माण होत आहे. सध्या गाव व वाड्यावस्त्यांवरील सुमारे तीनशेहून अधिक नागरिकांना टीपरच्या साह्याने कामती खुर्द येथील माध्यमिक शाळेत स्थलांतरित करण्यात आले आहे.
गावपातळीवर सामाजिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पूरग्रस्तांना धीर देत त्यांना सुरक्षितस्थळी पोहचविण्यासाठी युद्धपातळीवर मदत कार्य सुरू केले आहे. सध्या गाव व शेतीपंपाचा वीजपुरवठा दोन दिवसांपासून खंडित आहे. गावाला जोडणारे रस्ते बंद आहेत. पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.सध्या चारी बाजूनी पुराच्या पाण्याने वेढलेल्या ग्रामस्थांना प्रशासकीय पातळीवरुन ग्रामस्थांना तातडीने मदत मिळणे गरजेचे आहे.