सोलापूर : भीमा नदीला आलेल्या महापुरामुळे बेगमपूर-माचनूर दरम्यानचा पूल आज गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास पाण्याखाली गेला आहे. प्रशासनाने सोलापूर-मंगळवेढा महामार्गावरील वाहतूक बेगमपूर येथील इंदिरानगर चौकात थांबविली आहे.
मागील तीन ते चार दिवसांपासून उजनी धरण क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे धरण भरल्याने भीमा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आला आहे. सध्या बेगमपूर पुलावरून पुराचे पाणी वाहू लागले आहे. दरम्यान रात्री सव्वादोन लाखाच्या दरम्यान सोडलेल्या पाण्याचा विसर्ग अद्याप बेगमपूरपर्यंत पोचला नाही, तो विसर्ग आज रात्री उशिरापर्यंत पोचल्यास संपूर्ण पूल पाण्याखाली येणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
नदीकाठच्या शेतकऱ्यांनी नवीन ऊस व इतर पिकांच्या लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करून खते बियाणे खरेदी केली. परंतु या पुरामुळे हा केलेला खर्च पाण्यात गेला. खबरदारीचा उपाय म्हणून मार्गावरील वाहतूक थांबविली आहे. महापुरच्या पाण्याचा भीमा नदी काठावरील बेगमपूर, मिरी, अरबळी, अर्धनारी व मंगळवेढा तालुक्यातील बठाण, उचेठाण, ब्रम्हपुरी, माचनूर, रहाटेवाडी, तामदर्दी, सिध्दपूर, ताडोर या भागातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पुराच्या तडाख्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी नदीकाठी बसलेल्या मोटरी गेल्या दोन दिवसापासून मोठी लगबग करून सुरक्षित ठिकाणी ठेवल्या तर गत महिन्यातच उजनी धरण भरल्यामुळे भविष्यात उजनीतून नियमित पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे.