सांगली : तासगाव येथील पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस फौजदार प्रविणकुमार तुपे यांना एक हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज शुक्रवारी ही कारवाई केली. एका तक्रारीत तपासादरम्यान त्रास न देण्यासाठी पीडित व्यक्तीकडून तुपे यांनी ही लाच स्वीकारली होती. या सापळ्यामुळे तासगाव पोलीस ठाणे हादरले आहे.
याबाबत माहिती अशी, तासगाव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका प्रकरणाचा तपास लाचखोर सहाय्यक पोलीस फौजदार तुपे यांच्याकडे आहे. या प्रकरणात तपासादरम्यान पीडित व्यक्तीला त्रास देत नाही, असे सांगून तुपे यांनी पैसे मागितले. याबाबत तक्रारदाराने सांगली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारदार व्यक्तीची तक्रार नोंदवून घेत तुपे यांच्याविरोधात सापळा लावला. आज शुक्रवारी दुपारी तुपे यांनी पीडित व्यक्तीला बोलावून घेतले. त्याच्याकडून तुपे यांनी एक हजार रुपये लाच स्वीकारली. याचवेळी सापळा लावून थांबलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तुपे यांना रंगेहाथ पकडले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* दोन वर्षात निघाले तीन पोलीस ‘लाचखोर’
या प्रकारामुळे तासगाव पोलीस ठाणे हादरले आहे. पोलीस ठाण्यात सातत्याने लाचखोरीचे प्रकार घडत आहेत. गेल्या दोन वर्षात तीन पोलीस लाचखोरीच्या जाळ्यात अडकले आहेत. वायदंडे हे पोलीस 2 हजार रुपयांची लाच घेताना सापडले होते. तर थोरावडे हे पोलीस तब्बल 25 हजार रुपये घेताना सापडले होते. थोरावडे यांनी तर ही रक्कम चक्क वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावावर मागितली होती.
येथील पोलीस ठाण्यात गेल्या दोन वर्षात तीन पोलीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडल्याने खळबळ उडाली आहे. येथील पोलीस ठाणे म्हणजे लाचखोरांचा अड्डा बनल्याचे बोलले जात आहे. 15 दिवसांपूर्वी याच पोलीस ठाण्यातील एका महिला पोलीसाने साडेचार हजार रुपये लाच घेतल्याचे चव्हाट्यावर आले होते. त्यावेळीही सापळा लावला होता. मात्र सापळा लागल्याची बातमी ‘लिक’ झाल्याने सबंधित महिला पोलीस बचावली होती. या महिला पोलिसाचे प्रकरण निस्तरताना वरिष्ठांच्या नाकीनऊ आले होते. तर काही दिवसांपूर्वीच एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने एका तक्रारीत 1 लाख 60 हजार रुपयांवर डल्ला मारल्याचा प्रकार घडला. या प्रकरणाचीही जोरदार चर्चा शहरात आहे.