लखनौ : उत्तर प्रदेशातील कायदा-सुव्यवस्था स्थिती ढासळल्याचे आरोप विरोधकांकडून होत असतानाच त्या राज्यातील गुन्ह्यांचे सत्र कायम आहे. आता भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची ताजी घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या फिरोजाबाद जिल्ह्यात भाजप नेते डी.के.गुप्ता (वय 46) यांच्यावर हल्ला झाला.
दुकान बंद करून घराकडे जात असताना दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गुप्ता यांच्यावर गोळीबार केला. शुक्रवारी रात्री हा प्रकार घडला. जखमी अवस्थेत त्यांना रूग्णालयात हलवण्यात आले. तिथे त्यांचे निधन झाले. गुप्ता राहतात तो भाग टुंडला विधानसभा मतदारसंघात मोडतो.
‘सुराज्य डिजिटल’ आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, तर मग चॅनल जॉईन करा…फेसबुक पेज, टेलिग्राम, ट्वीटर आणि शेअरचॅटवरही उपलब्ध
त्या मतदारसंघात 3 नोव्हेंबरला पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळे गुप्ता यांची हत्या राजकीय वैमनस्यातून झाली का, या दिशेने पोलीस तपास करत आहेत. गुप्ता यांच्या हत्येनंतर पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
त्यातील एकाचा अलिकडेच फेसबुकवरून गुप्ता यांच्याशी शाब्दिक वाद झाल्याचे उघडकीस आले. भाजप नेत्याच्या हत्येमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. त्यातून कुठली अनुचित घटना घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.