अक्कलकोट : तुमचे सरकार आहे, बळीराजाचे सरकार आहे. बळीराज्याला वा-यावर सोडणार नाही. शेतकरी राजानो गोंधळून जाऊ नका. विश्वास ठेवा. समाधानकारक मदत करत आहोत. मदतीसाठी सरकार कुठेही मागे राहणार नाही, हे सरकार गोरगरीब बळीराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अक्कलकोट येथील बळीराजाला आज बांधावर, दारात जाऊन दिले.
सोमवारी सकाळी अतीवृष्टी ने नुकसान झालेल्या गावांची व घरांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री थेट अक्कलकोट येथे आले होते. पहिल्यांदा सांगवी खुर्द येथील बोरी नदीच्या पाण्यात वाहुन गेलेल्या ११ घरांच्या नागरिकांना संवाद साधून घर पडझड मदत अंतर्गत प्रत्येकी ९५ हजार शंभर रूपये असे एकूण १० लाख ४६ हजार शंभर रूपयाचा धनादेश दिला.
फेसबुक पेजबरोबरच ‘सुराज्य डिजिटल’ आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, तर मग चॅनल जॉईन करा…
त्यानंतर सांगवी बु येथील बोरी नदीवरील पुलाची पाहणी करण्यात आली.अक्कलकोट शहरातील हत्ती तलावाचे गळतीची पाहणी केली. रामपूर येथे घराची पडझड झालेल्या पाच घरांना प्रत्येकी ३ हजार ८०० प्रमाणे १९ हजार रूपये व २४ तास झाडावर घालवलेल्या रमेश बिराजदार याला २५ हजार रूपये पशुधन बाबत निधी दिले. नंतर बोरीउमरगे येथील पुलाची पाहणी करून येथील नागरिकांशी संवाद साधला व नुकसानीचा आढावा घेऊन मदत देऊ, असे आश्वासन दिले.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी रामपुर येथे सुनिता लक्ष्मण सुतार यांच्या विनंती वरून तिच्या घरात जाऊन पाहणी केली. आस्थेने केलेल्या विचारपूसमुळे माऊलीला अश्रू अनावर झाले. रामपूर गावात त्यांनी ग्रामस्थांची विचारपूस केली. नागरिकांना तातडीने मदत करावी, असे आदेश त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, कृषीमंत्री दादा भुसे, पालकमंत्री दतात्रय भरणे, मुख्यमंत्री स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर, शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, खासदार डॉ.जयसिध्देश्वर महास्वामी, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे,आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी कर्मचारी व शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, रासपा रिपाई चे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.