जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली असून एकनाथ खडसे अधिकृतरित्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती दिली आहे. शुक्रवारी, २३ ऑक्टोबरला एकनाथ खडसे दुपारी २ वाजता प्रवेश करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
गेले अनेक महिने नाराज असलेले खडसे भाजपला रामराम ठोकणार असल्याच्या चर्चा केल्या जात होत्या मात्र त्यांनी अशा अनेक मुहूर्तांना हुलकावणी दिली होती. मात्र, अखेर आज भाजपची ४० वर्षांची असलेली साथ सोडून त्यांनी पक्षाकडे राजीनामा सुपूर्द केला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
एकनाथ खडसेंच्या सुनबाई व खासदार रक्षा खडसे या भाजपमध्येच राहणार असल्या तरी खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे यांनी मात्र राष्ट्रवादीचीच वाट धरली आहे. त्यांनी फेसबुकवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो आता चर्चेचा विषय ठरत असून त्या हातातील घड्याळ बघत आहेत.
“मला विधानसभा निवडणुकीत तिकीट दिल्यानंतरदेखील निवडणूकीत पराभूत करण्यासाठी प्रयत्न केला गेला. याची तक्रार पुराव्यासह करुनदेखील भाजप पक्षश्रेष्ठींनी कोणतीही दखल घेतली नव्हती. मी देखील सक्रिय राजकारणात असून आता भाजपचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीचे काम करणार आहे” असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
“ज्या व्यक्तीने 40 वर्ष पक्षनिष्ठेने काम केलं त्यांना हा निर्णय घेताना दुःख होणं स्वाभाविक आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत नाथाभाऊंनी उत्तर महाराष्ट्रात पक्ष उभा केला” असं भावनिक वक्तव्य देखील त्यांनी केलं.